आरामबाग मतदारसंघात ‘तृणमूल’च्या मिताली बाग आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) बिप्लब कुमार मोइत्रा यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले भाजपचे अरूप कांती दिगर यांच्या प्रचारासाठी पुरसुरा येथे आयोजित सभेत मोदी बोलत होते. ‘ही निवडणूक पश्चिम बंगालच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आहे. ‘तृणमूल’च्या सत्ताकाळात येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. येथे राम मंदिराचे नाव घेणे हाही गुन्हा समजला जातो. तृणमूल काँग्रेस पक्ष राज्याची लूट करीत असून, मोठे पाप करीत आहे,’ असा हल्लाबोल मोदी यांनी या सभेत केला.
पंतप्रधान मोदी यांनी बराकपूर; तसेच हुगळी येथे प्रचारसभांना संबोधित केले. ‘संदेशखालीमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणातील आरोपींची राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून पाठराखण केली जात आहे. ‘तृणमूल’चे गुंड संदेशखालीतील महिलांना धमक्या देत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.
‘तृणमूल काँग्रेस मतपेढीचे राजकारण करीत आहे. तृणमूलच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालमध्ये हिंदू हे दुय्यम नागरिक ठरले आहेत,’ असा दावा करतानाच, ‘जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत ‘सीएए’ कोणीही रद्द करू शकणार नाही,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘वयाएवढ्या जागाही काँग्रेसला मिळणार नाहीत’
‘लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला त्यांच्या शहजाद्याच्या वयाएवढ्या जागाही मिळणार नाहीत,’ या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले. ‘भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला ४००हून अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘राज्यपालांबाबतच्या तक्रारींवर मौन का?’
अमदंगा : ‘संदेशखालीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने असत्य पसरवत आहेत. मात्र, राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपांबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. मोदींनी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही,’ असे टीकास्त्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी रविवारी सोडले. पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात बराकपूर लोकसभा मतदारसंघातील अमदंगा येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.