वाचा:‘योगी विरुद्ध मोदी’ ही भाजपची खेळी; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज काउन्सिल हॉल इथं झालेल्या बैठकीत शहरासह जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काही निर्णयांची घोषणा केली. त्यानुसार, पुणे शहरातील दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसंच, येथील मॉल देखील सुरू होणार आहेत. सोमवारपासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृहं मात्र तूर्त बंदच राहणार आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंधांमध्ये सध्या कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आषाढी वारीवरून राजकारण होऊ नये!
राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून पंढरपूरची आषाढी वारी पायी करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. भाजपनं या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘आषाढी पायी वारीला परवानगी नाही. दहा पालख्यांना बसमधून पादुका नेण्यास परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक पालखीबरोबर दोन बसेस असतील. एका बसमध्ये ३० वारकरी असतील,’ असं अजित पवार यांनी सांगितलं. पायी वारीवरून कोणीही राजकारण करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
वाचा: राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना पत्र; म्हणाले, तुम्ही समजून घ्याल!