Vastu Tips :
ज्योतिषशास्त्रानुसार गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे. हिंदू धर्मातील अनेकांचे आराध्य दैवत. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात गणपतीला सर्वात आधी पुजले जाते. गणपतीला विद्या, कला आणि बुद्धीचा देवता म्हणून ओळखला जातो.
भारतीय परंपरेनुसार गणपतीला विशेष असे महत्त्व दिले आहे. भारतातील अनेक घरांमध्ये श्रीगणेशाची नियमित पूजा केली जाते. अनेक दु:ख आणि संकट येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी मनोभावे श्रीगणेशाची पूजा केल्याने अडचणी दूर होतात.
वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य प्रवेशद्वार हे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यावर अनेक जण शुभ-लाभ, स्वस्तिकचे चिन्ह आणि दाराभोवती रांगोळी काढतात. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, प्रवेशद्वाराजवळ नकारात्मक गोष्टी ठेवल्याने घरात अनैतिक ऊर्जा येते. ज्यामुळे वास्तुदोष येतो. तसेच अनेक कामे रखडतात. पैशांची सतत चणचण भासते. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार नवे घर घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर श्रीगणेशाचे पूजन केले जाते किंवा वास्तुपूजा केली जाते. परंतु, घरावर अनेक संकटे, अडचणी किंवा समस्या येत असतील तर वास्तुदोष आहे हे पाहिले जाते. वास्तुशास्त्रानुसार अनेकजण घराच्या मुख्यद्वारावर किंवा घरात गणपतीचा फोटो लावतात. असे करणे शुभ की, अशुभ. जर फोटो लावायचा असेल तर त्याची दिशा कोणती? फोटो कोणत्या प्रकारचा असायला हवा. जाणून घेऊया सविस्तर
योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ श्रीगणेशाची मूर्ती ठेवताना त्याच्या दिशेची काळजी घ्यायला हवी. घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेला असेल तर गणेशाचा फोटो लावणे शुभ असते. परंतु जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर श्रीगणेशाची मूर्ती लावू नका.
फोटोची प्रतिष्ठापना कशी कराल
श्रीगणेशाच्या फोटोची प्रतिष्ठापना करताना गणपतीचे मुख आतील बाजूला असायला हवे. असे म्हटले जाते की, घराच्या मुख्य गेटवर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच जीवनात सुख, समृद्धी येते.
फोटोचा किंवा मूर्तीचा रंग
वास्तुनुसार श्रीगणेशाची मूर्ती निवडताना शेंदूर रंगाची असायला हवी. अशाप्रकारची मूर्ती शुभ मानली जाते. याशिवाय त्याच्या हातात लाडू किंवा मोदक आणि चरणाजवळ मूषक वाहन असणे अंत्यत शुभ असते. परंतु, जर घरात सतत कुणी आजारी किंवा भांडण होत असतील तर पांढऱ्या रंगाची मूर्ती ठेवावी. पांढरा रंग हा शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करते. तर सिंदूर रंगाची मूर्ती आत्मवृद्धीची इच्छा असेल तर त्यांनी ठेवावी.
गणपतीची सोंड
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्यदारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती बसवत असाल तर बाप्पाची सोंड ही डावीकडे असायला हवी. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते. तसेच घरातील वास्तुदोषही बरे होतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.