कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागातील एका गुरुद्वाराबाहेर १८ जून २०२३ रोजी हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अमनदीप सिंग याला कॅनडातील ब्रॅम्प्टन येथून ११ मे रोजी अटक करण्यात आल्याचे ‘रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसां’च्या (आरसीएमपी) ‘आयएचआयटी’ पथकाने म्हटले आहे. त्याच्यावर हत्येचा कट आणि हत्या घडविल्याचा आरोप आहे.
‘अमनदीप सिंगच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला अधिक बळकटी मिळाल्याचे ‘आयएचआयटी’चे अधीक्षक मनदीप मूकर यांनी सांगितले. ‘आयएचआयटी’ने अमनदीपविरोधात पुरेसे पुरावे गोळा केले असून, ब्रिटिश कोलंबिया सरकारी वकिलांसाठी पुरेशी माहिती जमा करण्यात आली आहे’, असेही मूकर यांनी स्पष्ट केले. निज्जर याच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखांरापैकी अमनदीप सिंग हा एक असल्याचे वृत्त कॅनडाच्या ‘ग्लोबल न्यूज’ने दिले आहे. सहआरोपींप्रमाणेच अमनदीप हा तात्पुरत्या व्हिसावर कॅनडामध्ये आला होता. कॅनडामध्ये हिंसक कारवायांमध्ये तो सामील झाला, असे सूत्रांनी सांगितले. अमनदीपकडून अत्याधुनिक पिस्तुलासह अन्य शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याआधी ‘आयएचआयटी’च्या तपासाधिकाऱ्यांनी करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२) आणि करणप्रीत सिंग (२८) या तिघांना ३ मे रोजी अटक केली होती. या तिघांसह चारही आरोपी भारतीय असून, ते बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने हा आरोप मुर्खपणाचा आणि विशिष्ट हेतूप्रेरित असल्याचा प्रत्यारोप केला होता. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला असून, अटकेच्या कारवायांमुळे उभय देशांदरम्यान कटुता वाढण्याचे संकेत आहेत.