पोळ्या लाटून, जेवण वाढून दिली लंगर सेवा
नरेंद्र मोदी यांनी पाटण्यातील गुरुद्वारा हरमंदिर साहिबला भेट दिली. या भेटीमध्ये ते शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांच्या पवित्र स्थळी नतमस्तक झाले. दर्शन घेतल्यानंतर मोदी यांनी स्वयंपाकगृहात जाऊन पोळ्या लाटल्या व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जेवण वाढत लंगर सेवा दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भगव्या रंगाचा फेटा परिधान केला होता. गुरुघरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गुरुद्वारा हरमंदिर साहिब भेट देणारे पहिलेच पंतप्रधान –
गुरुद्वारा हरमंदिर साहिबला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी गुरुद्वारामध्ये असणारे शस्त्रे पाहिली, लोकांना भेटले आणि सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांच्यासोबत पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.
पाटण्यात मोदींचा भव्य रोड शो
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून, पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी बिहारची राजधानी पाटणा येथे भव्य रोड शो केला. या रोड शो दरम्यान, फुलांनी सजवलेल्या रथाच्या आकारात बनवलेल्या भगव्या रंगाच्या वाहनावर पंतप्रधान मोदी यांनी उभे राहून हात हलवत लोकांचे अभिवादन स्वीकारले. पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्या समर्थनार्थ हा रोड शो आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री नितीश कुमार, रविशंकर प्रसाद आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी हे देखील उपस्थित होते.