उमेदवारी घोषित झाल्यानंतर राहुल यांनी रायबरेली मतदारसंघात पहिलीच सभा घेतली. येथील नागरिकांवर आपल्या कुटुंबाचे खूप प्रेम असल्यामुळेच आपण इथून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपली आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम केले, असेही त्यांनी सांगितले.
‘या सरकारने २२ ते २५ मोठ्या उद्योगपतींचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. ही रक्कम ‘मनरेगा’ योजनेसाठी जवळपास २४ वर्षे पुरली असती’, असा दावा त्यांनी केली. ‘‘इंडिया’ सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांची यादी तयार करून या कुटुंबांतील एका महिलेच्या खात्यात महिना आठ हजार ५०० प्रमाणे वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. याशिवाय छोट्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जाईल’, असे आश्वासन राहुल यांनी दिले.
संरक्षण दलातील ‘अग्निवीर’ ही योजना बंद करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. ‘तरुणांना सैन्यात पेन्शनसह कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल. देशभरातील तरुणांना सार्वजनिक उपक्रमांत प्रशिक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी दिली जाईल’, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या समस्या मांडण्याऐवजी अग्रगण्य उद्योगपतींच्या कुटुंबांच्या लग्न समारंभांना महत्त्व दिल्याबद्दल राहुल यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली.
‘अब जलदी करनी पडेगी’
रायबरेलीतील सभेवेळी राहुल यांनी प्रियांका गांधी-वड्रा यांना व्यासपीठावर बोलवले. आपण अन्य ठिकाणी सभा घेत असताना प्रियांका आपल्यासाठी रायबरेलीत ठाण मांडून होत्या, असे नमूद करत त्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी प्रियांका यांनी जनतेच्या मनातील सर्वांत मोठ्या प्रश्नाला उत्तर देण्याचे आवाहन राहुल यांना केले. काही क्षणांतच प्रियांका लग्नाबाबत (शादी) बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘अब जलदी करनी पडेगी’, असे उत्तर राहुल यांनी दिले.