पंतप्रधानांनी सोमवारी बिहारमधील हाजिपूर, मुझफ्फरपूर आणि सरन लोकसभा मतदारसंघांत एकापाठोपाठ एक प्रचारसभा घेतल्या. ‘इंडियाचे नेते पाकिस्तानला घाबरतात आणि त्यांना त्यांच्या अण्वस्त्रक्षमतेची भयावह स्वप्ने पडतात,’ अशी टीका त्यांनी केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून त्यांनी बांगड्या घातलेल्या नाहीत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा मोदी यांनी त्यांचे नाव न घेता समाचार घेतला. ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्यांना त्या घालायला भाग पाडू. त्यांच्याकडे अन्नधान्य नव्हते, हे मला माहीत होते. आता मला कळलेय की त्यांच्याकडे बांगड्यांचा पुरेसा साठादेखील नाही,’अशी टीका पंतप्रधानांनी केली.
‘दहशतवादाबाबत पाकिस्तानला क्लीन चिट देणाऱ्या आणि सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित करणाऱ्या भ्याड लोकांचा भरणा विरोधी पक्षांत आहे. त्यांचा सहकारी असणाऱ्या डाव्या पक्षांना आपल्याकडची अण्वस्त्रशक्ती नष्ट करायची आहे. अशा विरोधकांवर नीट लक्ष ठेवले पाहिजे,’ असे मोदी यांनी नमूद केले.
‘विरोधकांचे आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास त्यांच्या पाच नेत्यांना प्रत्येकी एक वर्ष पंतप्रधानपदाचा आनंद घेता येईल, असे सूत्र ‘इंडिया’ने आणले आहे. जर आघाडीची पाच वर्षांत दरवर्षी वेगळ्या पंतप्रधानाची योजना यशस्वी झाली, तर काय गोंधळ माजेल, याची कल्पना करा. परस्परविरोधी असणाऱ्या विरोधकांची ही आघाडी फोलच ठरणार आहे,’ असा दावाही मोदी यांनी केला. ‘तुम्ही धार्मिक आधारावर आरक्षण देणार नाही, असे लेखी लिहून द्या, असे आव्हान मी काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांना देऊन अनेक दिवस लोटले आहेत. मात्र त्यांनी त्यावर अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही,’ असेही मोदी यांनी नमूद केले.
‘मोदी सरकार ही श्रीरामाची इच्छा’
रायबरेली/बाराबाकी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच विजय होईल, असा दावा केला. प्रभू श्रीरामाचीही अशी इच्छा आहे की, त्यांच्या परमभक्ताने देशात पुन्हा सत्तेवर यावे,’ असे ते म्हणाले. योगी यांनी बाराबांकी, रायबरेली आणि बांदामध्ये प्रचारसभा घेतली. ‘केवळ रामद्रोही किंवा पाकिस्तानच मोदींना विरोध करत आहेत. मला समजत नाही की, राहुल गांधी यांचे पाकिस्तानशी नाते काय आहे? ते भारतात राहतात. रायबरेलीत मते मागतात आणि त्यांना पाकिस्तानकडून समर्थन मिळते,’ अशी टीका त्यांनी केली.