हायलाइट्स:
- अहमदनगरमध्ये करोना संसर्ग वाढत चालल्याने चिंतेत वाढ.
- अहमदनगरमधील रुग्ण उपचारासाठी पुण्यात जात असल्याने पुण्यातही चिंता
- करोना आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश.
अहमदनगर: राज्यात करोनाची (Coronavirus) रुग्ण संख्या कमी होत असताना अहमदनगरमध्ये मात्र संसर्ग अटोक्यात येत नाही. याचा त्रास आता पुण्यालाही होऊ लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी पुण्यात जातात. पुण्यातीस ससून हॉस्पिटलमध्ये चाळीस टक्के रुग्ण नगर जिल्ह्यातील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा पुढे आला. याची गंभीर दखल घेत पवार यांनी लगेच अहमदनगर जिल्हा प्रशासनाला यासंबंधी कडक उपाय योजना करण्याचा आदेश दिला. हे रुग्ण नेमके कुठले आहेत शोधा, संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी प्रसंगी गावबंदी करायची असेल तर तोही निर्णय घ्या, अशा सूचनाही पवार यांनी केल्या. (ajit pawar also took note of the growing number of corona patients in ahmednagar)
गेल्या काही काळापासून नगर जिल्ह्यातील संसर्ग अटोक्यात येताना दिसत नाही. विशेषत: संगमनेर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. दैनंदिन रुग्ण संख्या सहाशे ते सातशेच्या दरम्यान आहे. त्यामध्ये संगनेरला दररोज शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत असून त्या खालोखाल पारनेरचा क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यात यावरून चिंता व्यक्त होत असताना आता याची चिंता पुण्यातही असल्याचे समोर आले आहे आहे.
क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू; होता कामाचा पहिलाच दिवस
पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक झाली. त्यावेळी आकडेवारी पहाताना ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांपैकी चाळीस टक्के रुग्ण नगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले.
त्यावर पवार यांनी नाशिक आणि अहमदनगर येथील प्रशासकीय अधिकाऱयांसोबत चर्चा केली. हे रुग्ण कोठून येत आहेत, त्यांच्या ठिकाणी उपचार उपलब्ध नाहीत का? त्या भागात रुग्ण का वाढत आहेत, याचा शोध घेण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. जेथे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहेत, तेथे तातडीने कठोर निर्बंध लागू करा आणि करोनाचा संसर्ग अटोक्यात आणा, अशा सूचना त्यांनी केल्या.
क्लिक करा आणि वाचा- मनी लाँडरिंग प्रकरण: अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी
दरम्यान, दैनंदिन रुग्ण संख्येत आज पारनेर तालुका एक नंबरवर आहे. तेथे आज १२४ तर संगमनेरमध्ये ८८ रुग्ण आढळून आले आहेत. श्रीगोंदयात ६२ तर नगर तालुक्यात ५४ रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात आज ७४३ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला तर नव्या ६३९ बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. ४,५१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जे तालुके पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहेत, तेथील रुग्ण उपचार घेण्यासाठी पुण्याला जातात. बहुतांश रुग्ण ससूनमध्ये तर काही जण खासगी रुग्णालयांतही दाखल होत आहेत. पुण्यात रुग्णसंख्या तुलनेत कमी असल्याने तेथे खाटा आणि उपचार उपलब्ध होत असल्याने नगरच्या रुग्णांचा पुण्याला जाण्याकडे कल असल्याचे सांगण्यात येते.
क्लिक करा आणि वाचा- स्मृती मंधानाच्या शतकी खेळीने सांगलीत जल्लोष; झाली फटाक्यांची आतषबाजी