बराकपूरला जाज्वल्यपूर्ण इतिहास आहे. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल प्रांतात आपले बस्तान बसविले होते. याच कंपनीच्या बंगाल इन्फंट्रीचे अधिकारी लेफ्टनंट बाग यांच्यावर सैनिक मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती. सैन्यदलातील हा पहिला विद्रोह होता. हे १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख निमित्त ठरले. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या बॅराकपूरमध्ये पाचव्या टप्प्यात होत असलेली लोकसभा निवडणूक अतिशय उत्कंठावर्धक आहे.
बराकपूर छावणी क्षेत्र आहे. तेथे शस्रनिर्मितीसह अन्य उद्योगदेखील आहेत. गंगा नदीमुळे हा भाग समृद्ध झालेला आहे. गंगा येथूनच पुढे गंगासागरपर्यंत वाहत जाऊन समुद्रात सामील होते. त्यामुळे गंगेत पवित्र स्नानासाठीदेखील अनेक भाविक बराकपूरमध्ये येतात. केंद्र सरकारने २०१६ मध्ये ‘स्मार्ट गंगा’ प्रकल्प आणला. यात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून वाहणाऱ्या गंगाकाठच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. यात राज्यातील बराकपूर हे एकमेव क्षेत्र आहे. त्याअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र, बराकपूरमध्ये हा कथित विकास दिसून येत नाही.
बराकपूर लोकसभेअंतर्गत विधानसभेच्या सात मतदारसंघांचा समावेश होतो. आमडंगा, बीजपूर, नैहाटी, भाटपाडा, जगददल, नोआपाडा आणि बराकपूर असे ते मतदारसंघ आहेत. यातील भाटपाडा वगळता अन्य सर्व मतदारसंघ ‘तृणमूल’कडे आहेत. भाटपाडामध्ये विद्यमान भाजप खासदार अर्जुनसिंह यांचे पुत्र पवनसिंह आमदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुनसिंह यांनी ‘तृणमूल’ला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने उमेदवारी दिल्याने ते निवडून आले. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सातपैकी सहा जागांवर ‘तृणमूल’चा विजयी झेंडा फडकला. त्यामुळे अर्जुनसिंह यांना घरवापसीचे वेध लागले. त्यांनी ‘तृणमूल’मध्ये प्रवेशही केला. मात्र, लोकसभा सभासदत्वाचा राजीनामा काही दिला नाही; तसेच त्यांचे पुत्र भाजपमध्येच आहे. त्यामुळे ‘तृणमूल’ने त्यांना उमेदवारी देणे टाळले. तोंडघशी पडलेले अर्जुनसिंह भाजपमध्ये परतले. भाजपनेही पर्याय नसल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्यांनाच संधी दिली.
‘तृणमूल’ने फिरवली भाकरी
तृणमूल-भाजप अशा वारंवार फेऱ्या मारणाऱ्या अर्जनुसिंहांना ममतादीदींनी साफ नकार दिला. आताही आपला गड सावरण्यासाठी अर्जनुसिंहांची धडपड जनतेपासून लपून राहिलेली नाही. बॅराकपूर लोकलमध्ये पान विकणाऱ्या बिकासनाथला अर्जुनसिंह यांना निवडून दिले, तर आपल्या आयुष्यात फार काही मोठे घडणार नाही, असंच वाटतं. ‘तृणमूल’ने नैहाटीचे तीन टर्मपासून आमदार असणारे पार्थ भौमिक यांना संधी दिली आहे. भौमिक हे तृणमूलचे उत्तर २४ परगणाचे जिल्हाध्यक्षही आहेत. बॅराकपूरवासीयांसाठी ते अनोळखी नसले तरी आपले म्हणूनही वाटत नाहीत. ‘भाकप’ने डाव्या-काँग्रेस आघाडीतर्फे देवदूत घोष यांना उमेदवारी दिली आहे.