काम प्रगतीपथावर
राष्ट्रीय महामार्ग १४४-ए वरील चार बोगद्यांपैकी अखनूर आणि पूँच यांना जोडणारा सुंगल बोगदा हा दुसरा बोगदा आहे. या मार्गाला ‘गोल्डन आर्क रोड’ म्हटले जाते. यापूर्वी ७०० मीटर लांबीच्या नौशेरा बोगद्याचे खोदकाम २८ जानेवारीला पूर्ण करण्यात आले होते. याशिवाय २६० मीटर लांबीच्या कांडी आणि १.१ किलोमीटर लांबीच्या भिंबर गली या बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
सामरिकदृट्या महत्त्व
सुंगल बोगद्याबद्दल लेफ्टनंट जनरल श्रीनिवासन यांनी पत्रकारांना माहिती दिली. ‘जम्मू-पूँच टप्प्याचे काम वेगाने पुढे जात असून, सर्वांसाठी हा मोठा क्षण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी खालणाऱ्या शेजारील देशाच्या कारवाया लक्षात घेता, हा रस्ता सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे,’ असे त्यांनी सांगितले.
वर्षअखेरीस काम पूर्ण
‘सीमेवरील पूँच, राजौरी आणि अखनूर हे भाग संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. दळणवळण चांगले झाल्यास संरक्षण सज्जता वाढण्यास मदत होते. नौशेरा आणि सुंगल हे दोन्ही बोगदे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होतील,’ असे लेफ्टनंट जनरल श्रीनिवासन यांनी नमूद केले. सीमाभागातील संरक्षण पायाभूत सुविधांचा विकास करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रवासाचा वेळ वाचणार
‘हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जम्मू-पूँच दरम्यानच्या प्रवासाचा वेळ सध्याच्या आठ तासांवरून निम्म्याने कमी होईल. रस्ता रुंदीकरण आणि चार बोगदे यामुळे सर्व ऋतुंमध्ये दळणवळण सुरू राहील आणि सुरक्षित प्रवास करता येईल. या महामार्गाच्या २०० किलोमीटर लांबीच्या अखनूर-पूँछ टप्प्यामुळे सीमाभागातील आर्थिक समृद्धी वाढेल,’ असेही लेफ्टनंट जनरल श्रीनिवासन यांनी सांगितले.
महामार्ग २०२६मध्ये पूर्ण होणार
जम्मू आणि पूँच दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असून, सन २०२६पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जम्मू-पूँछ भागातील प्रमुख ठिकाणे दुर्गम भागांशी जोडण्यासाठी बीआरओ रस्त्याचे प्रकल्प राबवत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.