भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले हे देशभक्तीपर गीत आहे. अध्यक्षांनी या वार्षिक कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेल्या भारतीय अमेरिकन नागरिकांच्या विनंतीला मान देत, व्हाइट हाउस मरिन बँडने दुसऱ्यांदा पुन्हा हे गीत वाजवले.
‘रोझ गार्डन येथे व्हाइट हाउसच्या ‘एएएनएचपीआय’ हेरिटेज महिन्याचा हा एक अप्रतिम उत्सव होता. मी व्हाइट हाउसमध्ये प्रवेश केला, तेव्हा वादकांनी ‘सारे जहाँ से अच्छा…’ हे गीताचे सूर वाजवले’, असे भारतीय अमेरिकन समाजाचे नेते अजय जैन भुतोरिया यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
हे देशभक्तीपर भारतीय लोकप्रिय गीत एका वर्षाच्या आत व्हाइट हाउसमध्ये दुसऱ्यांदा वाजविले गेले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी २३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक राज्य भेटीदरम्यान या गीताचे सूर येथे निनादले होते. या भेटीपूर्वी या गाण्याच्या वादनाचा खास सराव केल्याचे मरिन बँडकडून सांगण्यात आले होते.