हायलाइट्स:
- राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला डिवचलं!
- अमोल कोल्हे यांनी केलं अजित पवारांचं कौतुक
- अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय – कोल्हे
पुणे: पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विरोधकांबरोबरच मित्र पक्षांनाही सूचक इशारे दिले जात आहेत. मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला इशारे दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रिपदी पाहण्याची इच्छा आहे, असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. ‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय. त्यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पिंपरी चिंचवडसाठी अजित दादांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी या शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांच्याकडून आता अपेक्षा करण्याऐवजी त्यांच्यासाठी काही तरी करण्याची वेळ आली आहे. त्यांचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांच्या नेतृत्वाला बळ दिलं पाहिजे, असं कोल्हे म्हणाले.
वाचा: …म्हणून माझ्या मागे ईडीचा ससेमिरा; एकनाथ खडसे अखेर मनातलं बोलले!
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही अमोल कोल्हे यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. ‘पवार साहेब हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधान पदी पाहायचं असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असं काम आपण करायला हवं. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन कोल्हे यांनी केलं.
शिवसेनेला उत्तर?
अमोल कोल्हे यांचं हे वक्तव्य म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेलं उत्तर असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांत पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली होती. मित्र पक्षांनाही इशारे दिले होते. ‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेना सर्वांच्या वर आहे. अजित पवारांना शिवसैनिकांचं ऐकावंच लागेल,’ अशी वक्तव्य राऊत यांनी केली होती. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
वाचा: ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच नवी योजना; काय आहेत वैशिष्ट्ये?