आज अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आज झाला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते.
‘मला बरेच आमदार, ठेकेदारांनी निवेदन देतात तेव्हा मला प्रश्न पडतो की मी राज्याचा बांधकाम मंत्री झालो की काय. तुम्ही मला पाच- पाच किलोमीटरच्या सीआरएफची लिस्ट देणार तर मी कसं काम करणार,’ असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मी आता १२०० कोटी शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस आणि विरोधीपक्षाला दिले आणि ८०० कोटी माझ्याकडे असताना मी ते आमदारांना मंजूर केले. तुम्ही मला मोठी कामं द्या. जी हजार- दोन हजार कोटींच्या वरची आहेत. तुमच्या जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते मी भारत माला- २ मध्ये नक्की घेईन, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
वाचाः …म्हणून मी शक्यतो रस्त्यानं प्रवास करतो: शरद पवार
‘आपल्या राज्यात एक एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च होता. १८ कोटी देऊन कसे रोड बांधणार, आणि आता तो दर कमी होणार आहे. माझ्या सचिवांनी पत्र काढलं होतं की १८ कोटी हा दर कमी केल्याशिवाय महाराष्ट्रात विकास कामे होणार नाहीत. त्याशिवाय मी बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो त्यात आता बदल होत आहे,’ असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
‘मी जेव्हा पंतप्रधान सडक योजना आणली तर तेव्हा एक सचिव राज्याचे काम आहे म्हणून अडवत होते. मग मी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना संकल्पना दिली की पेट्रोलवर सेस लावा. ज्या राज्यातून पैसे येतील तेथे काम करू,’ अशी आठवण यावेळी गडकरींनी सांगितली.
‘पाच राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातून जाणार आहेत. अडलेली भूसंपादन कामे मार्गी लावा, अशा सूचना गडकरींनी दिल्या आहेत. तसंच, उड्डाणपूलाच्या कामासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी खूप पाठपुरावा केला. आज ते नाहीत याचं दुःख आहे,’ असंही गडकरींनी म्हटलं आहे.
वाचाः LIVE इथेनॉल गाडीतूनच फिरेन असं सर्वांनी ठरवावं – नितीन गडकरी
‘सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर चेन्नई ग्रीन फिल्ड रस्ता नगर जिल्ह्यातून जाणार आहे. हा देशातील महत्त्वाचा रस्ता आहे. अन्य रस्त्यावरही वाहतूक कमी होईल. त्यामुळं नगर यामुळं मुख्य प्रवाहात येईल. त्यामुळं त्याभोवती जागा दिली तर आम्ही तेथे सोयी उभारु,’ अशा विश्वास यावेळी गडकरींनी व्यक्त केला आहे.