हायलाइट्स:
- सर्वसामान्य मुंबईकरांंकडून क्लीनअप मार्शलनी पैसा उकळणे धक्कादायक- महापौर किशोरी पेडणेकर.
- अशा क्लीनअप मार्शलवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करणार- महापौर पेडणेकर.
- त्यांच्या कंत्राटदारांवर देखील कारवाई करणार, त्यांची नावे काळ्या यादीत टाकणार- महापौर पेडणेकर.
मुंबई: करोनाचा वाढता संसर्ग (Coronavirus) मुंबईत आटोक्यात असला तरी देखील करोनाची संभाव्या तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी नियम तोडू नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल्सची (Clean up Marshal) नियुक्ती केली. या क्लीनअप मार्शल्सकडून चुकीच्या पद्धतीने मुंबईकरांकडून पैसा उकळला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. अशा मार्शल्सवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका मुंबई महापालिकेने घेतली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ही माहिती दिली आहे. (Strict action will be taken against cleanup marshals who loot money from Mumbaikars)
काही क्लीनअप मार्शल चुकीच्या पद्धीतने मुंबईकरांकडून पैसे उकळत असल्याचे स्टिंग ऑपरेशन एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुंबई माहापालिकेला या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली.
क्लिक करा आणि वाचा- मनी लाँडरिंग प्रकरण: अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी
मार्शलांसह कंत्राटदारांवरही होणार कारवाई
सर्वसामान्य मुंबईकरांची अशा प्रकारे लूट होणे धक्कादायक असून या प्रकाराशी मुंबई महारालिकेचा काहीही संबंध नसल्याचे महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणी संबंधित कंत्राटदारांसोबच बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. स्टिंग ऑपरेशनमध्ये जे चेहरे दिसत आहेत अशांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. इतकेच नाही तर संबंधित कंत्राटदारांवर देखील कारवाई करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्यात येतील, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?; अजित पवार म्हणाले..
या प्रकरणी सोमवारी आयुक्तांसोबत एक बैठक होणार असून त्या बैठकीत कारवाईबाबत निर्णय होणार आहे. घडलेला प्रकार पाहता क्लीनअप मार्शल ठेवूच नये असे वाटू लागल्याचे पेडणेकर म्हणाल्या. मात्र, जर सर्व नागरिकांनी मास्क घालून नियमांचे पालन केले, तर क्लीनअप मार्शल ठेवण्याची काहीच आवश्यकता भासणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबईत ७५० क्लीनअप मार्शल कार्यरत
महापालिकेने मुंबईत २४ विभागांमध्ये पाच एजन्सींना क्लीनअप मार्शल योजनेचे काम दिले आहे. नागरिक करोना प्रतिबंधात्मक नियम पाळतात का यावर हे मार्शल लक्ष ठेवून असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, केरकचरा टाकणे, मास्क न वापरणे अशा प्रकारांवर कारवाई करण्याचे अधिकार मार्शलना आहेत. संपूर्ण मुंबईत सुमारे ७५० क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- यंदा नवरात्रोत्सवही साधेपणाने; महापालिकेची नियमावली जाहीर