हायलाइट्स:
- ६ वर्षीय मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न
- आरोपी युवकाला नागरिकांकडून चोप
- गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकाला अटक
नागपूर : चॉकलेटचे आमिष दाखवून ६ वर्षीय मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. तसंच नंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.
सोनू छेडी यादव (वय २५, रा. गजानननगर) असं अटकेतील युवकाचं नाव आहे. सोनू हा मूळ उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे. कामाच्या शोधात आठवडाभरापूर्वी तो नागपुरात आला. त्याने भाड्याने खोली घेतली. तो परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. शुक्रवारी दुपारी सोनूने दारू प्यायली होती. त्यानंतर तो एका हॉटेलमध्ये गेला.
हॉटेलमालकाचा ६ वर्षीय मुलगा तेथे खेळत होता. सोनूने त्याला चॉकलेट व शीतपेयाचे आमिष दाखवलं आणि त्याला सोबत घेऊन सोनू हा राजीवनगर परिसरातील नाल्याजवळ गेला. तेथे तो मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्याच्या प्रयत्नात होता. नागरिकांना तो संशयास्पद स्थितीत दिसला. त्यामुळे नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला.
दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनेच पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला आणि आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आले.