काय आहे ही नवीन फसवणूक
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला घरी बसून पैसे कमवण्यासाठी ऑनलाइन नोकरीच्या शोधात होती. काही संशोधनानंतर, त्या अशा लोकांच्या संपर्कात आल्या ज्यांनी त्यांना रेस्टॉरंट आणि कंपन्यांना रेट करण्यासाठी फ्रीलान्स कामाची ऑफर दिली. त्यांनी पहिली पाच कामे पूर्ण केल्यानंतरच त्यांना मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले, जे महिलेने मान्य केले.
असे दाखवले आमिष
जेव्हा महिला काम करू लागली तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स रेट करण्याच्या लिंक शेअर केल्या. यासोबतच त्यांनी महिलेला जास्त नफ्याचे आमिष दाखवून शेअर केलेल्या खात्यात पैसे गुंतवण्यासही पटवून दिले. अशाप्रकारे महिलेने हळूहळू वेगवेगळ्या खात्यांमध्ये 54 लाखांहून अधिक रक्कम जमा केली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही सर्व रक्कम महिलेने यावर्षी 7 मे ते 10 मे दरम्यान जमा केली होती. परंतु, जेव्हा त्यांनी त्यांचे काम पूर्ण करून पैसे घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांनी प्रतिसाद न देता त्यांचे फोन कट करण्यास सुरुवात केली.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात येताच त्यांनी नवी मुंबईतील सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून चार अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अशा फ्रॉडपासून कसे रहाल सुरक्षित
- कंपनीची सखोल चौकशी करा.
- नाव गुगल करा.
- वेबसाइट तपासा.
- तुमची माहिती कोणालाही देऊ नका.
- विश्वसनीय प्लॅटफॉर्म वापरा.