यंदाच्या तिमाहीत बेरोजगारीत घट; जानेवारी ते मार्चकाळात ६.७ टक्के दर, शहरी भागात काय स्थिती?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : देशातील शहरी भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांमधील बेरोजगारी वाढली असली, तरी एकूण स्त्री-पुरुषांमधील बेरोजगारीच्या दरात गेल्या वर्षभरात काहीशी घट झाली आहे, असे निरीक्षण सरकारी संस्थेने नोंदवले आहे.

देशाच्या एकूण श्रमशक्तीमधील बेरोजगारांच्या टक्केवारीला बेरोजगारी दर म्हणतात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षी जानेवारी-मार्च या तिमाहीत बेरोजगारीचा दर ६.८ टक्के होता. त्यानंतर, एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर तिमाहीत तो ६.६ टक्क्यांवर आला, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान बेरोजगारी दर साडेसहा टक्क्यांपर्यंत वाढला.

शहरी भागात काय स्थिती?

‘पीरियॉडिक लेबर फोर्स’च्या सर्वेक्षणानुसार, (पीएलएफएस) यंदा जानेवारी ते मार्च या तिमाहीत शहरी भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील पुरुषांमध्ये सरासरी बेरोजगारीचा दर ६.१ टक्के आणि महिलांमध्ये साडेआठ टक्के होता. गेल्या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत हाच दर ९.२ टक्के होता. एप्रिल-जून २०२३मध्ये तो ९.१ टक्के, जुलै-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-डिसेंबर २०२३मध्ये प्रत्येकी ८.६ टक्के नोंदवला गेला. चालू वर्षातील जानेवारी-मार्च या तिमाहीत शहरी भागातील पुरुषांमधील बेरोजगारीचा दर ६.१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर सहा टक्के होता. मागच्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये तो ५.९ टक्के, जुलै-सप्टेंबरमध्ये ६ टक्के आणि ऑक्टोबर-डिसेंबर या काळात ५.८ टक्क्यांवर आला.

श्रमशक्ती म्हणजे काय?

श्रमशक्ती हा लोकसंख्येच्या व रोजगाराच्या मापनाचा एक भाग आहे. यामध्ये नोकरदार आणि बेरोजगार दोघांचाही समावेश असतो. ‘पीएलएफएस’ने एप्रिल २०१७मध्ये श्रमशक्ती उपक्रम सुरू केला. यात प्रत्येक तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर, कामगारसंख्येचे प्रमाण, कामगार सहभागाचा दर यांसारख्या अनेक बाबींवरील माहिती जारी केली जाते.

श्रमशक्तीमध्ये वाढ

शहरी भागात १५ वर्षांवरील पुरुषांमधील सध्याच्या साप्ताहिक स्थितीत श्रमशक्ती सहभागाचा दर जानेवारी-मार्च दरम्यान वाढून ५०.२ वर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ४८.५ होता.

बेरोजगारी म्हणजे काय?

जे लोक काम करायला तयार आहेत; पण त्यांना काम मिळत नाही या स्थितीला अर्थशास्त्रात बेरोजगारी असे संबोधले जाते. बेरोजगारीचेही अनेक प्रकार आहेत. कोणत्याही प्रकारचा रोजगार न मिळणे म्हणजे, पूर्ण बेरोजगारी. ज्यांना गुणवत्तेनुसार किंवा कौशल्यानुसार काम मिळत नाही, ती अर्धबेरोजगारी होय.

Source link

nsso reportunemploymentunemployment rate decreaseunemployment rate in india
Comments (0)
Add Comment