ही निवडणूक एकतर्फी असल्याचे कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक अधोरेखित करतात. देशाचे पंतप्रधान आमचे खासदार आहेत. त्यांनी देशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. काशीचा विकास केल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. ओघानेच रिक्षा व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यवसाय विस्तारला आहे. रोजगार वाढला. चार पैसे हाती मिळतात… मतदार विकासकामांची यादी वाचून दाखवत होते; पण या शहरात समस्याही दिसतात. मुळात वाराणसीचे रस्ते हे विस्तारलेले नाहीत. कसेबसे दोन मार्गिकांचे. शिवालासारख्या भागात गाड्यांची वर्दळ सुरू झाली, की चालायलाही जागा मिळत नाही. जागोजागी होणारी वाहतूककोंडी वेळेचा अपव्यय करते. ई-रिक्षांची दाटीवाटी झाली आहे. त्यांच्यासाठी रिक्षातळ जवळपास नाही. त्यामुळे या रिक्षा कुठेही उभ्या केल्या जातात. त्या रस्ता अडवतात आणि मागून येणाऱ्या गाड्या खोळंबून राहतात. वाराणसी पर्यटनाच्या दृष्टीने विस्तारत आहे; परंतु आवश्यक पायाभूत सुविधांचा आणखी विकास व्हायला हवा. रस्ते, गल्लीबोळ विस्तारण्याचा नव्याने विचार करायला हवा. कारण रस्त्यांअभावी रिक्षा गंतव्यस्थानाच्या आधीच एखाद्या चौकात सोडतात. मोठी पायपीट करावी लागते, अशा तक्रारी नागरिक मांडतात.
या मतदारसंघातून काँग्रेसकडून अजय राय आणि बहुजन समाज पक्षाकडून अतहर जमाल मैदानात उतरले आहेत; परंतु मतदारांना अन्य उमेदवारांची नावेही माहिती नाहीत, असा दावा भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विविध समाजांचे रहिवासी गुण्यागोविंदाने राहतात. मुस्लिमांमध्ये शिया मुस्लिम भाजपचे मतदार आहेत. मोदी पंतप्रधान असूनही ते खासदार झाल्यापासून ४४ वेळा वाराणसीला आले होते. तीन महिन्यांत एकदा असे हे प्रमाण आहे. ते जेव्हा येतात, तेव्हा तीन-चार हजार कोटी रु.च्या विकासकामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण करतात. १३ डिसेंबर, २०२१मध्ये त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोरचे उद्घाटन केले. या प्रकल्पात ३०० घरांचा अडथळा होता. त्यांना योग्य भरपाई देण्यात आली. यामुळे पर्यटकांचा ओघ वेगाने वाढला आहे. तीन वर्षांत सुमारे १५ कोटी भाविकांनी दर्शन घेतले आहे,’ भाजपचे काशीक्षेत्र मीडिया प्रभारी संतोष सोलापूरकर सांगत होते. वाराणसीत पूर्वी विजेची समस्या असे. आता हा प्रश्न मिटला आहे. पूर्वी महिन्यातून तीन-चार यात्रेकरू येत असत. आता नाही म्हणावे लागते, इतक्या संख्येने नागरिक येतात, असे घरीच यात्रेकरूंची सोय करणारे व्यावसायिक उत्साहाने सांगत होते.
नेहमीच रंगते राजकारणाची चर्चा
शिवाला भागात मारवाडी सेवा संघाच्या बाजूला एका छोटेखानी ‘पप्पू की चाय’ या चहाटपरीवर सतीशसिंह चहा बनवतो. आतमध्ये लक्ष जाताच समोर दिसतात, त्या नरेंद्र मोदी यांच्या विविध प्रतिमा. बाहेर विविध गटांची गर्दी. यामध्ये कार्यकर्त्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सगळ्याच वर्गवारीतील लोक. चहाचा घोट घेत काँग्रेस, भाजप, सप अगदी महाराष्ट्रातील शिवसेना… एकावर एक नावे त्यांच्या तोंडून येत होती. त्यावर हास्यविनोदही होत होते. केवळ निवडणुका म्हणून नव्हे, तर इथे हे नेहमीच होते, चहाप्रेमी उत्साहाने सांगत होते. या दुकानाला चार मार्च, २०२२मध्ये खुद्द नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती. ‘मी स्वप्न बघत आहे, असे त्या वेळी वाटले,’ हे सांगताना सतीश यांचा चेहरा चांगलाच खुलला. याच दुकानावरून ‘चाय पे चर्चा’ संकल्पना पुढे आल्याचे सांगितले जाते.
कायदा-सुव्यवस्थेचे योगींना श्रेय
वाराणसी, अयोध्येसह उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर नागरिक समाधान व्यक्त करतात. गुंडगिरी आता खूपच कमी आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले जाते. आदित्यनाथ यांना स्टार प्रचारक म्हणूनही नागरिकांनी स्वीकारलेले दिसते. भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आली, तर त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार की नाही, याबाबत मात्र चर्चांना उधाण आलेले आहे.