हायलाइट्स:
- अंबाबाई मंदिरात थेट दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय
- बुकिंगविना मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध
- जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात थेट दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय करण्यात आली आहे. याशिवाय ऑनलाइन दर्शनाबरोबरच बुकिंगविना मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. एका तासाला ५०० भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार असून सर्व धार्मिक विधी मात्र गर्दीविना होणार असल्याचं जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितलं आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीबाबत पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात फार गर्दी होवू नये यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार पहाटे चार वाजल्यापासून भाविकांना मंदिर देवीच्या दर्शनासाठी खुले राहील. दर्शनमंडपातून देवीचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. एका तासाला साधारणता ५०० भाविकांना दर्शन घेता येईल. त्यामुळे दिवसभरात सात हजारावर भाविकांना देवीचे थेट दर्शन होईल. याशिवाय महाद्वार चौकातून मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, रात्रीचा पालखी सोहळा ठराविक भाविकांच्या उपस्थितीत होईल. त्र्यंबोली यात्राही ठराविक भाविकांच्या उपस्थितीत होणार असून मिरवणुकीऐवजी पालखीतून देवीची मूर्ती नेण्यात येणार आहे. देवीचे दर्शन ऑनलाइन घेण्याची सुविधा असून शहरातही विविध ठिकाणी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शहरात भाविकांच्या सोयीसाठी १९ ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर १५ ऑक्टोबरनंतर शहरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, शहर उपअभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता नारायण भोसले उपस्थित होते.
दरम्यान, ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती महिनाभरात होणार असून याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण आहे. काही दिवसात अधिकृत नियुक्ती जाहीर होईल,’ असंही पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.