लस घेतलेल्या ५० टक्के लोकांना श्वसनाचा त्रास
बनारस हिंदू विद्यापीठाच्या अहवालानुसार ९२६ लोकांवर संशोधन आणि निरीक्षण करण्यात आले. स्प्रिंगर नेचर या जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनातील ९२० व्यक्तींपैकी सुमारे ५० टक्के लोकांना कोवॅक्सिन घेतल्यानंतर श्वसन संक्रमण झाल्याची तक्रार होती.
चार जणांचा मृत्यू
बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ६३५ किशोर आणि ३९१ प्रौढांचा समावेश करण्यात आला होता. लसीकरण झाल्यानंतर एक वर्षानंतर या सर्व लोकांना तपासणीसाठी संपर्क करण्यात आला. अभ्यासानुसार, १०.५ टक्के किशोरवयीनांना त्वचेशी संबंधित आजार, १०.२ टक्के सामान्य आजार आणि ४.७ टक्के मज्जासंस्थेशी संबंधित आजारांनी ग्रासले होते. तर कोवॅक्सिन घेतल्यानंतर ४.६ टक्के महिलांमध्ये मासिक पाळीतील असामान्यता दिसून आल्याचीही या अभ्यासात दावा करण्यात आला आहे. तसेच तीन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. या चारही जणांना मधुमेह होता. व त्यापैकी दोघांनी कोवॅक्सिन लस घेतली होती.
घाबरण्याची गरज नाही
या अहवालावर आईसीएमआरचे माजी डीजी डॉ. एन.के. गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ”कोवॅक्सिन घेणाऱ्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवत असतील तर, त्याचे कारण फक्त कोवॅक्सिन आहे? की आणखी काही आहे? हे देखील पाहावे लागेल. कारण अशा समस्या जीवनशैलीशी संबंधित देखील असू शकतात. लस तयार करणाऱ्या कंपन्यांचा सुरुवातीला फॉलोअप घेतला जात नाही, त्यामुळे कंपन्या वेगळेच दावा करतात पण फॉलोअप केल्यानंतर सर्व काही कळते. परंतु बनारस हिंदू विद्यापीठाने कोवॅक्सिनच्या बाबत घेतलेल्या फॉलोअपमध्ये साइड इफेक्ट्सची टक्केवारी खूपच कमी आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.”