दिल्ली पोलिसांचे पथक गुरुवारी रात्री उशीरा विभवकुमारला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा पोलिसांना तो घरी आढळला नाही. त्याच्या पत्नीकडे पोलिसांनी विभवकुमारबाबत चौकशी केली. सध्या पंजाबमध्ये असलेल्या विभवकुमार याला लवकरात लवकर शोधण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षासह चार पथकांना देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथक न्यायवैद्यक तज्ज्ञांसह मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरीही पोहोचले. त्यानंतर मालीवाल यांनाही तेथे बोलावण्यात आले. त्यानंतक पोलिसांनी मालीवाल यांच्यासह या घटनेची फेरनिर्मिती केली.
पोलिसांनी विभवकुमार याच्याविरुद्ध कलम ३५४ (विनयभंग), ३२३ (प्राणघातक हल्ला), ५०६ (जिवे मारण्याची धमकी) आणि ५०९ (अशोभनीय टिप्पणी करणे) या कलमांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री अकरानंतर खासदार मालीवाल यांना ‘एम्स’मध्ये तपासणीसाठी नेले. त्या चार तासांनंतर मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिस संरक्षणात आपल्या घरी पोहोचल्या. स्वाती यांच्या चेहऱ्यावर अंतर्गत जखमा झाल्या आहेत असे अहवालात म्हटले आहे. विभव याने आपल्याला मारहाण करताना कमरेखाली लाथ मारल्याचा मालीवाल यांचा आरोप आहे; तसेच विभवकुमारने चेहऱ्यावर सात-आठ थपडा मारल्या, पोटात आणि पोटाखाली लाथांनी मारले, असेही मालीवाल यांनी तक्रारीत नमूद केले. मालीवाल यांनी दुपारी तीस हजारी न्यायालयात जाऊन जबाबही नोंदविला.
विभवला पुन्हा नोटीस
मालीवाल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी विभवकुमारला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. मात्र, तो आयोगासमोर हजर राहिला नाही. या प्रकरणी त्यााल पुन्हा नोटीस बजावल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिली.
दर वेळेप्रमाणेच या वेळीही राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपल्या लोकांना ट्वीट करायला लावून, संदर्भाशिवाय अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून गुन्हेगार स्वतःला वाचवेल असे त्यांना वाटते. कोणी कोणाला मारहाण करताना व्हिडिओ बनवतो का? घर आणि खोलीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. देव सर्व काही पाहत आहे. एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल.- स्वाती मालीवाल, खासदार
‘मालीवालप्रकरणात भाजपचे कारस्थान’
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपही जोरात सुरू झाले आहेत. भाजपनेच खासदार मालीवाल यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी पाठविण्याचे कारस्थान रचले, असा आरोप ‘आप’ ने शुक्रवारी केला. दुसरीकडे, हे प्रकरण तापत चालल्यावर केजरीवाल यांच्याशी दिल्लीत आघाडी केलेल्या काँग्रेसमध्ये चलबिचल वाढत चालली आहे. दिल्लीत राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची संयुक्त जाहीर सभा घेण्याची योजनाही तूर्तास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे.