फिर मंदिर नही बनाएंगे? नड्डांनी भाजपची भूमिका मांडली; योगी आदित्यनाथांची विचित्र कोंडी

नवी दिल्ली: राम मंदिरानंतर काशी, मथुरेतील मंदिरांचा विषय चर्चेत आला. अयोध्या तो झांकी है… काशी मथुरा बाकी है, अशी घोषणा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी गंगा नदीच्या तटावर केली होती. मात्र काशी, मथुरेत मंदिर उभारण्याची कोणतीही योजना नसल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

राम मंदिरासाठी भारतीय जनता पक्ष मोठं आंदोलन उभं केलं. त्याचा राजकीय लाभही पक्षाला झाला. राम मंदिरासाठी भाजपनं प्रदिर्घकाळ संघर्ष केला. अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचं लोकार्पण झालं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी काशी, मथुरेतील वादग्रस्त जागांवर मंदिरं उभारण्याच्या घोषणा केल्या. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा आघाडीवर आहेत. भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर नड्डांनी सविस्तर भाष्य केलं.
JP Nadda: RSS की जरुरत पडती थी! संघ-भाजप संबंधांवर नड्डांचं महत्त्वाचं विधान; टायमिंगची चर्चा
काशी, मथुरेत मंदिरं उभारण्याची भाजपची कोणतीही योजना नसल्याचं नड्डा म्हणाले. ‘काशी, मथुरेत मंदिर उभारणीची कोणतीही संकल्पना, योजना आणि इच्छा नाही. त्यावर कोणतीही चर्चादेखील झालेली नाही. अशा गोष्टी करताना आमची एक प्रक्रिया आहे. असे विषय आधी संसदीय बोर्डात चर्चिले जातात. मग ते राष्ट्रीय परिषदेत येतात,’ असं नड्डा म्हणाले. पक्षानं दलित, वंचित, तरुण, शेतकरी, महिला यांच्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांच्या शक्तिकरणास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

भाजपचेच नेते असलेले योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्व सर्मा काशी, मथुरेत मंदिर उभारण्याबद्दल निवडणूक प्रचारात बोलले आहेत, याची आठवण नड्डा यांना करुन देण्यात आली. त्यावर नड्डा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘राम मंदिराचा विषय भाजपच्या अजेंड्यावर होता. पालमपूरमध्ये १९८९ मध्ये झालेल्या बैठकीत त्याबद्दलचा ठराव मांडला गेला. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर राम मंदिराचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. याबद्दल बोलताना अनेक जण भावुक होतात. भावनेच्या भरात ते बोलून जातात. आमचा पक्ष मोठा आहे. प्रत्येक नेत्याची बोलण्याची शैली आहे,’ असं म्हणत नड्डांनी योगी आणि बिस्वा यांची भूमिका ही भाजपची भू्मिका नसल्याचं सांगितलं.

Source link

bjpjp naddakashimathuraकाशीजे. पी. नड्डाभाजपमथुरा
Comments (0)
Add Comment