पश्चिम बंगाल सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या हुगळी नदीकाठावर हा जिल्हा आहे. एकेकाळी औद्योगिक पट्टा म्हणून हा भाग सुपरिचित होता. राज्यातील डाव्या आघाडीच्या दीर्घ सत्तेच्या पतनास कारणीभूत ठरलेला सिंगूर प्रकल्पदेखील याच भागात येतो. हुगळी मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी यांना पुन्हा संधी दिली आहे. लॉकेट या बंगाली अभिनेत्री व नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध आहेत. २०१५मध्ये भाजपवासी झाल्यानंतर त्यांना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. आता त्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. दक्षिणेश्वर काली मंदिराच्या पुजारी कुटुंबाचा त्यांना वारसा आहे.
लॉकेट यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने बंगालीसह अर्ध्या डझनपेक्षा अधिक भाषांतील चित्रपटांमध्ये आपली छाप पाडलेल्या रचना बॅनर्जी यांना उतरविले आहे. मराठीतील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्ये ‘दीदी नंबर वन’ या टीव्ही शोची प्रचंड क्रेझ आहे. रचना यांच्यामुळे हा कार्यक्रम ‘टीआरपी’चे नवे उच्चांक गाठू शकला. आता हुगळीतून निवडणूक लढवित रचना आपल्या राजकीय कारर्किदीला सुरुवात करीत आहेत.
रचना आणि लॉकेट या तारकांपुढे ‘माकप’ने मनोदीप घोष यांना उतरविले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चुंचुरातील डच कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावरील क्यावटा कॉलनीच्या कोपऱ्यावर एका हॉटेलमध्ये राजकारणाच्या गप्पांत ‘ये औरतो कें लढाई में मर्द का कोई काम नही,’ असे मत प्रबोध मांडतो. ‘स्थानिक पातळीवर रोजगार मिळतो का?,’ या प्रश्नाचे त्याच्याकडे नकारार्थी उत्तर आहे. उलट तो सांगतो, ‘हुगळी नदीकाठी ज्यूट मिल होत्या. आता त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. नवीन उद्योग येत नाही.’ जिल्ह्यात भातासोबत, आंबा, पशुपालन केले जाते. चुंचुरा, चंदननगर, मनकुंदू, बैद्यबाटी, सेओराफुली या भागात छोटी तळी दिसतात. त्यात मत्स्यपालन केले जाते. ‘जिल्ह्यात शेती करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी तृणमूलने प्रयत्न केले नाहीत’, अशी खंत हावड्याला अप-डाउन करणारा सुब्बू सांगतो.
लॉकेट चॅटर्जी या पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांमध्ये मानल्या जातात. मात्र त्याचा फायदा हुगळीला मिळण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाही, असे मतदार सांगतात. आमच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून आडकाठी केली जाते, असा भाजपचा दावा आहे. रचना बॅनर्जी कलाकार म्हणून चांगल्या असतील. मात्र, खासदार लॉकेट यांनी आपले काम आणि स्वभाव यामुळे जनतेच्या मनात स्थान मिळविले आहे. त्यामुळे त्याच पुन्हा निवडून येतील, असा दावा भाजप नेते करतात. रोजगाराच्या मुद्यावर तृणमूल आणि भाजप दोन्ही सपशेल अपयशी ठरल्याने ‘माकप’ला संधी आहे, असे डाव्या आघाडीला वाटते.
पर्यटनाबाबत अनास्था
हुगळी जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आहेत. तारकेश्वर येथे जगप्रसिद्ध शिव मंदिर आहे. राज्यातील सर्वात पहिले चर्च बंदेल येथे १५९९ साली उभारले गेले. पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ येथे येऊन गेला होता. मुस्लिमांसाठीचे श्रद्धास्थान असलेल्या इमामबाड्याच्या बांधकामास याच नदीकाठी १८४१ मध्ये सुरुवात झाली होती. टॉवर क्लॉक असलेल्या या वास्तूची उभारणी वीस वर्षांत झाली. ही तिन्ही ठिकाणे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. बंगाली साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेल्या ‘देवदास’ कादंबरीचे लेखक शरतचंद्र चटोपाध्याय हेसुद्धा याच जिल्ह्यातले. बंदेलजवळील देबानंदपूर येथील त्यांचे जन्मस्थळ वारसा म्हणून जतन केले गेले आहे. यासह अन्य ठिकाणांची पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोणतीही खास व्यवस्था हुगळीमध्ये दिसत नाही.