हायलाइट्स:
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा कारवाईचा धडाका सुरूच.
- क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आणखी ५ जणांना अटक.
- शाहरुखच्या मुलासह आतापर्यंत आठ जणांना बेड्या.
मुंबई: मुंबई-गोवा क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. या सर्वांना उद्या (सोमवारी) कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. याप्रकरणी आधीच अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत याप्रकरणात एकूण आठ जणांना अटक झाली आहे. ( Mumbai Rave Party Latest Update )
वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी कारवाई; शाहरुखच्या मुलासह तीन जणांना अटक
ड्रग्ज पार्टी प्रकरणी आणखी पाच जणांवर अटकेची कारवाई केल्यानंतर एनसीबीने त्याबाबत माहिती दिली आहे. नुपूर सतिजा, इश्मितसिंग चड्ढा, मोहक जयस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर अशी या पाच जणांची नावे आहेत. या सर्वांची उद्या प्रथम वैद्यकीय चाचणी करण्यात येईल आणि नंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. मुख्य म्हणजे आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांसोबतच या पाचही जणांना क्रूझवरून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र प्रथम आर्यन, अरबाज आणि मूनमून यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली व नंतर आता अन्य पाच जणांवरही तशीच कारवाई करण्यात आली आहे.
वाचा: आर्यनकडे ड्रग्जचा साठा व मोठी रोकड; अॅरेस्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
दरम्यान, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तिघांना किला कोर्टात हजर करण्यात आले असता उद्यापर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आजची रात्र शाहरुखच्या मुलाला कोठडीतच काढावी लागणार आहे. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असून उद्या त्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
एनसीबीने अशी केली कारवाई?
मुंबईहून गोवा येथे निघालेल्या कॉर्डेलिया या क्रूझवर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत शुल्क आकारले होते. या हायप्रोफाइल पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करण्यात आल्याची खबर एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीची टीम आधीपासूनच या पार्टीच्या मागावर होती. एनसीबीच्या २२ जणांच्या पथकाने चक्क पार्टीच्या तिकीट खरेदी करत थेट क्रूझवर धडक दिली. शनिवारी क्रूझवर पार्टी रंगात आली असतानाच रात्री उशिरा या पथकाने कारवाई केली व ही पार्टी उधळली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले व शाहरुखचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना चौकशीअंती आता अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या तपासातून महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
वाचा: शाहरुखच्या मुलासह ८ जणांना ताब्यात का घेतलं?; NCB प्रमुख म्हणाले…