खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी आपला विशेष कार्य अधिकारी विभव कुमार याला अटक केल्याच्या निषेधार्थ केजरीवाल यांनी ‘आप’चे नेते, कार्यकर्त्यांसह भाजपच्या मुख्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रचंड संख्येने तैनात केलेले पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी भाजप मुख्यालयाच्या चारही बाजूंना कडेकोट सुरक्षा उपाययोजना केल्याने केजरीवाल आणि नेते सुमारे अर्धा तास त्या परिसरात थांबून माघारी परतले. भाजप कार्यालय परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. पोलिसांनी रविवारी सकाळपासून आयटीओ मेट्रो स्थानक आणि आसपासचे रस्ते बंद केले होते. भाजपने ‘आप’ कार्यकर्त्यांना आपल्या कार्यालयाजवळ जाऊ दिले नाही तर मोदी आणि भाजपचा तो पराभव असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले.
केजरीवाल यांच्यासह ‘आप’चे खासदार, दिल्लीतील आमदार, नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ‘आप’ मुख्यालयात जमले. ‘आमचे नेते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह यांना अटक करण्यात आली. त्यांनी माझ्या ‘पीए’लाही अटक केली. आता ते राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज आणि आतिषी यांनाही अटक करतील. पण आम्ही घाबरत नाही. उलट एकेकाला अटक करण्यापेक्षा आम्ही सर्व तुमच्याकडे भाजप मुख्यालयात येतो, तुम्ही सर्वांनाच अटक करा, असे माझे मोदी यांना सांगणे आहे’, असे केजरीवाल म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींनी २०२२च्या पंजाब निवडणुकीत म्हटले होते की, केजरीवाल हे खलिस्तानी दहशतवादी आहेत. त्यांना खलिस्तान निर्माण करून तेथील पंतप्रधान व्हायचे आहे. पंतप्रधानांकडून अशा हास्यास्पद गोष्टी ऐकल्यावर हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, याची कीव येते.
ते येत्या १०-१५ दिवसांत कोणत्याही थराला, कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. तुम्ही सारे सावध राहा’, असे आवाहन केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना केले. आम्हाला देश सुधारायचा आहे. मी ५० दिवस तुरुंगात राहिलो आणि या काळात मी गीता दोनदा आणि रामायण एकदा वाचले, असेही केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांचे भाषण झाल्यावर सारेजण ‘आप’ कार्यालयापासून जेमतेम ३०० मीटरवर असलेल्या भाजप मुख्यालयाकडे रणरणत्या उन्हात पायी गेले. त्यानंतर केजरीवाल, संजय सिंह, राघव चढ्ढा, आतिषी, संजय पाठक आदी नेते काही मिनिटेच रस्त्यावर थांबले आणि नंतर आपापल्या गाड्यांत बसून परतले. भाजप मुख्यालयाच्या अलीकडेच पोलिसांनी सारे रस्ते बंद केले होते. दीनदयाळ उपाध्याय मार्ग तिन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून व लोखंडी अडथळे उभारून बंद करण्यात आला होता.
दुटप्पीपणाचा भाजपचा आरोप
‘आम आदमी पक्षाने एकेकाळी दिल्लीत निर्भया प्रकरणावरून आंदोलन केले होते. आता तेच एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत’, असे प्रत्युत्तर भाजपने दिले. ‘आप’चे ताजे आंदोलन म्हणजे केजरीवाल यांचा ‘इमोशनल अत्याचार’ आहे, असा टोलाही भाजपने लगावला.