आपण आठवेळा मतदान केल्याचा दावा एटामधील एका व्यक्तीनं केला होता. त्यानं मतदान करत असतानाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही व्हिडीओ शेअर केला. घटना उघडकीस येताच एटा जिल्ह्याच्या नयागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचं नाव असून राजन सिंह असून तो पमारान गावचा रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
व्हिडीओ समोर येताच मतदान केंद्रावरील सगळ्या सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या उर्वरित टप्प्यांमध्ये नियमांचं कठोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हिडीओमध्ये एक तरुण ईव्हीएमजवळ उभा असलेला दिसतो. आपण आठवेळा मतदान केल्याचा दावा तो करतो. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘यात काही चुकीचं घडलंय असं वाटत असेल तर निवडणूक आयोगानं कारवाई करावी. अन्यथा… भाजपची बूथ समिती खरंतर लूट समिती आहे,’ असं यादव यांनी एक्सवर म्हटलं आहे.
समाजवादी पक्षानं त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. ‘फर्रुखाबाद लोकसभेतील अलीगंज विधानसभेतील पमारानमधील बूथ क्रमांक ३४३ अल्पवयीन तरुणानं भाजपला ८ वेळा मतदान केलं. यातून बूथ कॅप्चरिंग झाल्याचं दिसतं. याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी आणि आरोपींविरोधात योग्य कारवाई करायला हवी,’ अशी मागणी करण्यात आली आहे.