हायलाइट्स:
- संजय राऊत यांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान
- चंद्रकांतदादांनी शिवसेनेला दिली होती पिंजऱ्यातील वाघाची उपमा
- वाघाच्या पिंजऱ्यात येऊन दाखवा – राऊत
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू झालेली शाब्दिक टीका-टिप्पणी थांबायचे नावच घेत नाही. पाटील यांनी शिवसेनेची ‘पिंजऱ्यातला वाघ’ अशी संभावना केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाटलांना थेट आव्हान दिलं आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut Challenges Chandrakant Patil)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच राज्याच्या प्रश्नांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे देखील त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर ठाकरे व मोदी यांच्यात स्वतंत्र चर्चाही झाली. यावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास वाघाशी मैत्री करायला आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यावर, ‘कोणाशी मैत्री करायची ते वाघ ठरवतो,’ असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं होतं.
वाचा: नेमकं काय करणार आहात; चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सवाल
संजय राऊत यांच्या खोचक टीकेला उत्तर देताना पाटील यांनी शिवसेनेला पिंजऱ्यातला वाघ म्हटलं होतं. ‘आम्ही नेहमीच मैत्रीसाठी तयार असतो. पण वाघाचे म्हणाल तर आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर होता, तोपर्यंत आमची मैत्री होती,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: पुणे पुन्हा गजबजणार! सोमवारपासून मॉल सुरू होणार
‘चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळं त्यांना गांभीर्यानं घेऊ नका. पण शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादांना वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो. हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा,’ असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.
वाचा: ‘योगी विरुद्ध मोदी’ ही भाजपची खेळी; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप