यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ड्रग्ज आणि रोख रक्कम वाटप करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. तपास यंत्रणांनी कारवाई करत आतापर्यंत रोख रक्कम, दारू, ड्रग्जसह अंदाजे ९,००० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही रक्कम २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील एकूण जप्तीच्या अडीच पट जास्त आहे. पुढील दोन आठवड्यांत जप्तीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
५.४ कोटी लिटर दारू जप्त
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ८,८८९ कोटी रुपयांच्या एकूण जप्तीपैकी सुमारे ४५ टक्के ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा वाटा आहे. २३ टक्के विनामूल्य सामग्री आणि १४ टक्के मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. ८४९ कोटी रुपये रोख आणि ८१५ कोटी रुपयांची सुमारे ५.४ कोटी लिटर दारू जप्त केली आहे.
गुजरातमध्ये सर्वाधिक जप्ती
गुजरातमध्ये सुमारे १,४६२ कोटी रुपयांची सर्वाधिक वसुली झाली आहे. राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे ८९२ कोटी रुपयांचा अवैध माल जप्त करण्यात आला आहे. गुजरातशिवाय महाराष्ट्र आणि दिल्लीतही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी १७ एप्रिल रोजी ग्रेटर नोएडामध्ये ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता.