शहा यांनी यावेळी सत्ताधारी बीजेडी सरकारला जोरदार टीका केली. ओडिशात मूठभर अधिकाऱ्यांची सत्ता असून बीजेडी सरकारने ओडिशाचा अभिमान, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘या निवडणुकीमुळे राज्यात सुरू असलेले ‘बाबू राज’ संपुष्टात येईल. भाजप राज्यात सत्तेवर आल्यास पक्षाकडून तरुण, उत्साही, मेहनती आणि गतिमान असा ओडिया ‘भूमिपुत्र’ मुख्यमंत्री म्हणून दिला जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रचारसभेत त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही लक्ष्य केले. ‘मुख्यमंत्री नवीन पटनायक राज्याच्या खनिज संपत्तीची लूट करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. ते ओडिशावर ‘बाबू शाही’ लादत आहेत आणि ओडिया लोकांच्या स्वाभिमानावर आणि प्रतिष्ठेवर घाला घालत आहेत. ते राज्याच्या संस्कृतीचा आणि अभिमानाचा गळा घोटत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘ओडिशातील नागरिकांनी भाजपला मत दिल्यास उत्कल भूमीवर भूमिपुत्रांचे राज्य असेल, तमिळ बाबूंचे नाही,’ असा विश्वास शहा यांनी दिला.
रथयात्रा थांबवण्याचे षडयंत्र
‘बीजेडी सरकारला जगन्नाथ मंदिराचे व्यावसायिक केंद्र बनवायचे आहे. मठ आणि मंदिरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि मंदिराचे चारही दरवाजे अद्याप भाविकांसाठी उघडलेले नाहीत. भगवान जगन्नाथाची जगप्रसिद्ध रथयात्रा थांबवण्याचे षडयंत्रही रचले गेले होते,’ असा दावा शहा यांनी यावेळी केला. तसेच, संबळपूर येथे भाजप ५०० खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय बांधेल आणि तेंदू पान कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद करेल, असे आश्वासन शहा यांनी यावेळी दिले.