हवाई अपघातामध्ये विशेष महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झालेली ही पहिली घटना नाही. देशपातळीपासून ते जागतिक स्तरावर घडलेल्या अशा अनेक आकस्मिक दुर्घटनांनी आजवर भारतासह जगाला हादरवून सोडले होते. अशा घटनांमध्ये भारताचे पहिले लष्करप्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेतील दुर्देवी अंत याचा देखील समावेश होतो. हा अपघात भारतीयांसाठी एक धक्काच होता. तर देशाच्या पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचा विमान अपघातात झालेला मृत्यु अत्यंत दुखद होता. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमचे माजी कर्णधार हंसी क्रोनिए हे देखील हवाई अपघाताचे शिकार झाले होते.
जनरल बिपिन रावत यांचे अपघाती निधन
भारतीय सैन्य दलांचे पहिले प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान झालेला मृत्यु हा मनाला चटका लावून जाणारा होता.भारतीय सैन्यदलामध्ये प्रदीर्घ कार्य व अनुभवी राहिलेले बिपिन रावत हे ०८ डिसेंबर २०२१ रोजी आपली पत्नी व भारतीय वायू सेनेच्या आपल्या चमूसह Mil Mi-17 या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. त्यांना वेलिंग्टन येथील ‘डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज’ येथे एका व्याख्यानाकरीता जायचे होते, परंतु दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील जंगलांमध्ये खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले व यामध्ये त्यांच्यासहीत त्यांच्या पत्नीसह वायुसेनेच्या १० जवानांचा अंत झाला होता.
संजय गांधींची हवाई कसरत ठरली होती जीवघेणी
भारताच्या पूर्व प्रधानमंत्री राहिलेल्या इंदिरा गांधी यांचे सुपुत्र आणि राजीव गांधी यांचे छोटे बंधू संजय गांधी हे देखील विमानदुर्घटनेचे बळी ठरले होते.२३ जून १९८० रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळावर हवाई कसरती दरम्यान,ते उड्डाण करत असलेल्या विमानाचा ताबा सुटला व ते विमान क्षणार्धात जमिनीवर कोसळले. यामध्ये संजय गांधी यांच्यासह त्यांचे सह पायलट सुभाष सक्सेना यांचा जागीच अंत झाला होता.
माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचा शेवटचा प्रवास
१ जून २०००२ साली एका सिंगल पैसेंजर विमानाने प्रवास करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमचे माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांचा विमानाला अपघात झाला होता आणि त्यात त्यांचे निधन झाले. क्रोनिए हे आफ्रिका क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी कर्णधार होते. आपल्या मृत्युच्या २ वर्षांपूर्वी क्रोनिए यांनी मॅच फिक्सिंग केल्याचे कबूल केले होते, त्यामूळे ते वादात सापडले होते.१ जून २००२ रोजी जोहान्सबर्गवरुन जॉर्जकडे जाण्यासाठी निघाले असता,जॉर्ज विमानतळ परिसरात त्यांच्या पायलटचा विमानावरुन ताबा सुटला व त्यांचे विमान जमिनीवर कोसळले. यामध्ये पायलटसह त्यांचा जागीच अंत झाला.
मुख्यमंत्री वाईएसआर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाईएसआर रेड्डी हे २ सप्टेंबर २००९ रोजी बेल ४३० या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते.आंध्र प्रदेशातील कुर्नुल येथील डोंगराळ भागातून जात असताना सकाळी १० वाजता खराब हवामानामूळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला व त्यांचा हेलिकॉप्टर जंगली भागामध्ये कोसळले.अपघातस्थळी नक्षलवादी प्रभावी असल्याने या घटनेबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. मात्र भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याबाबतची शक्यता फेटाळली. या अपघातात वाईएसआर रेड्डी यांचे अपघातस्थळी झालेल्या स्फोटात निधन झाले होते.