राज्यघटनेनुसार प्रथम उपराष्ट्रपती राष्ट्राध्यक्षपद स्वीकारणार
इराणचे ८५ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांचे उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या रायसी यांच्या आकस्मिक निधनामुळे इराणचे मोठं राजकीय नुकसान झालंय. इराणच्या राज्यघटनेच्या कलम १३१ मध्ये असे म्हटले आहे की जर राष्ट्रपती हे त्यांच्या कार्यकाळात मरण पावले, तर प्रथम उपराष्ट्रपती तात्पुरते अध्यक्षपद स्वीकारतात. सध्या मोहम्मद मोखबर हे इराणचे पहिले उपराष्ट्रपती आहेत.
५० दिवसांत निवडणुका घ्याव्या लागणार
इराणच्या राज्यघटनेनुसार इब्राहिम रायसी यांचे उत्तराधिकारी विद्यमान उपराष्ट्रपती असतील. मात्र त्यांची राष्ट्रपतीपदावर नियुक्ती सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मान्यतेवर अवलंबून असेल. याशिवाय, प्रथम उपराष्ट्रपती, संसदेचे अध्यक्ष आणि न्यायपालिकेचे प्रमुख यांचा समावेश असलेल्या परिषदेने जास्तीत जास्त 50 दिवसांच्या आत नवीन राष्ट्रपतीपदाची निवडणूक आयोजित करणे आवश्यक असणार आहे.
मोखबर यांची सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्याशी जवळीक
१ सप्टेंबर १९५५ रोजी जन्मलेले मोखबर, रायसी यांच्याप्रमाणेच सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या जवळचे मानले जात आहेत. इब्राहिम रायसी २०२१ मध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मोहम्मद मोखबर हे पहिले उपराष्ट्रपती झाले. मोखबर हे इराणी अधिकाऱ्यांच्या टीमचे एक भाग होते. त्यांनी नुकतीच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मॉस्कोला भेट दिली आणि रशियाच्या सैन्याला पृष्ठभागावरून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पुरवण्याचे मान्य केले. या टीममध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. इराणचे सर्वोच्च नेते खमेनेई यांच्याशी निगडीत असलेल्या सेताड या गुंतवणूक निधीचेही मोखबर प्रमुख होते. खमेनी यांनी २००७ मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.