हरयाणा मधील कर्नल येथे जनसभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. सिंह म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते वारंवार वक्तव्य करतात पंतप्रधान मोदींच्या आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळाल्या तर ते लोकशाही धोक्यात आणतील.’ पण मी म्हणतो, ‘जेव्हा इंदिरा गांधी १९७५ मध्ये निवडणूक हरल्या तेव्हा त्यांनी नैतिकतेचे भान ठेवून राजीनामा द्यायला हवा होता. पण त्यांनी तर आणीबाणी घोषित केली आणि लोकशाहीचा गळा घोटला.’
पुढे बोलताना राजनाथ सिंहांनी असेही अधोरेखित केले की, ‘लाखो लोकांना तुरुंगात टाकले, मी स्वत: २४ व्या वर्षी अडीच महिन्यांसाठी तुरुंगात राहिलो. काँग्रेसने लोकशाही धोक्यात आणली. तसेच आणीबाणी काळ १ महिन्यासाठी वाढणार या धक्क्याने माझ्या आईचा जीव गेला.’
दरम्यान हरयाणातील १० लोकसभा मतदारसंघांत २५ मे ला सहाव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार केला जातोय. उद्या येथील प्रचारतोफा थंडावणार आहेत. परंतु, राजनाथ सिंहाच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.