इंडिया महाआघाडीच्या वतीने येथून माकप (माले)चे राजारामसिंह कुशवाह येथून निवडणूक लढवत आहेत. या जागेसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल पवन सिंह यांच्यावर बिहार भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या आदेशावरून हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे.
तावडेंनी समजूत काढली, कुशवाह राजी, पण पवन सिंह यांनी गणित बिघडवले
लोकसभा निवडणुकीत बिहारमधून एकच जागा मिळाल्याने सुरवातीला नाराज असलेले राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष कुशवाह यांनी एनडीएला रामराम करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बिहारचे प्रभारी असलेले भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी त्यांची समजूत काढली. त्यांना आगामी विधानसभेत जास्त जागा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर कुशवाह यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्यासमोर करकट लोकसभा मतदारसंघात पवन सिंह यांच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले. पवन सिंह यांच्याशी तावडे यांनी चर्चा करूनही ते बिहारमधूनच लढण्याचा हट्ट सोडेनात तेव्हा भाजप नेतृत्वाने त्यांच्याविरुद्ध पक्षातून हकालपट्टीचे अस्त्र उगारले.
तुमचे काम पक्षशिस्तीच्या विरोधात, आम्ही पक्षातून काढून टाकतोय
बिहार राज्य मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी पवन सिंह यांना जारी केलेल्या नोटिशीत लिहिले आहे की, लोकसभा निवडणुकीत तुम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहात. तुमचे हे काम पक्षशिस्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे पक्षविरोधी काम केल्याबद्दल तुमची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्यात आली आहे.
आधी भाजपने तिकीट जाहीर केलं, पण पवन सिंह यांनी नाकारले
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत भाजपने पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून भोजपुरी गायक पवन सिंह यांना तिकीट दिले होते. त्यांचा सामना तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होता. पवन सिंह यांनी तिकीट मिळाल्याबद्दल भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचे आभार देखील व्यक्त केले. आसनसोलशी आपले रक्त- घाम आणि रोजीरोटीचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांची एक वादग्रस्त सीडी रातोरात प्रसार माध्यमांवर फिरू लागली आणि दिल्लीतील भाजप नेतृत्व दचकले. पवन सिंह यांच्याशी चर्चा करण्यात आली व तिकीट जाहीर झाल्यावर एका दिवसानंतर त्यांनी बंगालमधून निवडणूक लढवण्यास असमर्थता व्यक्त केली.
करकटमध्ये आता तिरंगी लढत
त्यानंतर भाजपने त्यांच्या जागी वरिष्ठ नेते एस एस अहलुवालिया यांना आसनसोलमधून उमेदवारी दिली. मात्र त्यानंतर पवन सिंह यांनी काही दिवसांनी बिहारच्या काराकत मधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘माता गुरुतारा भूमेरू. म्हणजे या भूमीपेक्षा आई खूप श्रेष्ठ आहे आणि यावेळी मी निवडणूक लढवणार असे वचन मी आईला दिले होते.’ येथून भाजपने भाजपने तेथून कुशवाह हे एनडीएचे अधिकृत उमेदवार असतील असे ठरविले होते. पवन सिंह यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवल्याने करकट जागेवरील लढत तिरंगी झाली.