हायलाइट्स:
- राज्यात गुरुवारपासून मंदिरं खुली होणार
- शिर्डीतील साई मंदिराबाबत आज निर्णय अपेक्षित
- नगर जिल्ह्यातील करोना संसर्गामुळं संभ्रम कायम
अहमदनगर: राज्य सरकारने सात ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अद्याप यासंबंधी काहीही निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी दुपारी शिर्डीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होत आहे. त्यावेळी यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Shirdi Saibaba Temple)
करोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. तेथील शाळा आणि धार्मिक स्थळेही बंद राहणार आहेत. याशिवाय अन्य भागातील धार्मिक स्थळे खुली करण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितले आहे. राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. एका बाजूला काही गावांत लॉकडाउन करण्याची वेळ आलेली असताना दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करावीत का, यासंबंधी प्रशासन विचार करीत आहे. नवरात्रात मंदिरांत एकदम गर्दी होणार आहे, त्यामुळे तेथे नियमांचे काटेकोर पालन होऊ शकेल का, यासंबंधी काय उपाय केले, याची हमी घेतल्याशिवाय धार्मिक स्थळे खुली करता येणार नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे, या पार्श्वभूमीवर आज शिर्डीत होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
वाचा: शिर्डीतील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीचा पेच कायम
सात ऑक्टोबरपासून मंदिर खुले होणार, हे लक्षात घेऊन शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केली आहे. दररोज पंधरा हजार भाविकांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. त्यामध्ये पाच हजार मोफत पास ऑनलाईन पद्धतीने, पाच हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने असे नियोजन करण्यात आले आहे. दोन भाविकांमध्ये सहा फुटांचे अंतर राहील अशी आखणी करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली आहे. मंदिरात मूर्तीच्या गाभार्यात हात न लावता मूर्ती दर्शन घेण्यास परवानगी आहे. शिर्डीत सध्या लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दुकानदार आणि नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, भाविकांना लसीकरणासंबंधीची अट सरकारकडूनच घालून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थाननेही यासंबंधी काहीही धोरण अद्याप नक्की केलेले नाही.
वाचा: मित्रांसोबत पोहायला गेले होते, घरी परतलेच नाहीत; नंतर कळलं की…
नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा साईसंस्थानचे विश्वस्त शिवाजी गोंदकर यांनी सांगितले की, शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. शहरात जवळपास लसीकरण पूर्ण होत आहे. शिर्डी शहरातील व्यवसायिकांनीही लसीकरण केले आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार अटीशर्तींचे पालन करण्यात येणार आहे. भाविकांना तसे आहवाहन करण्यात येत आहे.
वाचा: ‘…तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती’