राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी उत्तर प्रदेशातील संपूर्ण घटनाक्रमावर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘लखीमपूर खेरी इथं शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत होते. सरकारकडं आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा हक्क बजावत होते. त्यांच्यावर सत्ताधारी भाजपशी संबंधित लोकांनी गाडी घालून त्यांना चिरडले. हा सरळसरळ शेतकऱ्यांवरचा हल्ला आहे. उत्तर प्रदेश व केंद्र सरकारनं याची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे,’ असं शरद पवार यांनी ठणकावलं.
LIVE हा शेतकऱ्यांवरचा हल्लाच; लखीमपूर घटनेवरून शरद पवार कडाडले
‘लखीमपूर येथील घटनेचा केवळ निषेध करून समाधान होणार नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी घोषणा केली आहे. मात्र, आम्हाला ते मंजूर नाही. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी शरद पवार यांनी केली.
उत्तर प्रदेशात इतका हिंसाचार होऊनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, याकडं पवारांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले, ‘ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला झाला, त्यावरून केंद्र सरकारची नियत दिसली आहे. आज तुमच्याकडं सत्ता आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करून तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही एक दोन दिवस असं करू शकाल. पण फार काळ हे चालणार नाही. ह्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी तुम्हाला देईल.’
राष्ट्रपतींना भेटणार?
उत्तर प्रदेशातील घटनेच्या संदर्भात राष्ट्रपतींची भेट घेण्याचा विचार आहे का याबाबत विचारलं असता, ‘ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करू. राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. सर्व विरोधी पक्षांना मिळून त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. तूर्त तरी याविषयी माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही,’ असं पवार म्हणाले.
वाचा: ‘…तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती