हायलाइट्स:
- जलसाठ्यात एका वृद्धेचा मृतदेह आढळला
- बुधवारपासून बेपत्ता होती महिला
- महिलेनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ कालव्यात पंप हाऊसच्या जलसाठ्यात एका वृद्धेचा मृतदेह आढळला आहे. बेडग-आरग रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. बुधवारपासून (२९ सप्टेंबर) ही महिला बेपत्ता होती. कमलाबाई महनतया हिरेमठ (वय ८२, रा. बेडग) असं मृत महिलेचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या बुधवारी कमलाबाई हिरेमठ यांचा कुटुंबातील व्यक्तींशी वाद झाला होता. वादानंतर त्या रागाने घरातून निघून गेल्या होत्या. त्यांनतर कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर कमलाबाई या बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी मिरज ग्रामीण पोलिसात दाखल केली.
दरम्यान, मंगळवारी (ता. ५ ) पोलीस पाटील शारदा हांगे यांना एका व्यक्तीने म्हैसाळ योजनेच्या पंप हाऊसच्या जलसाठ्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे सांगितलं. तात्काळ हांगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी भेट दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून कौटुंबिक वादानंतर या महिलेनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.