निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात ५८, पश्चिम बंगालमध्ये जवळपास ७८.४, जम्मू-काश्मीरमध्ये ५६.७६, झारखंडमध्ये ६३.२१, लडाखमध्ये ७१.८२, महाराष्ट्रात ५६.८९, ओडिशामध्ये ७३.५ टक्के मतदान झाले. ही आकडेवारीही अंतिम नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या वाढीव आकडेवारीबद्दल नव्याने एक वाद निर्माण झाला आहे. निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या एडीआर संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, निवडणुकीच्या ४ टप्प्यांनंतर मतदानाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत असून आयोगाच्याच माहितीत तब्बल सुमारे १ कोटी ७ लाख मतांची तफावत आहे.
काँग्रेसने यावर म्हटले आहे की, पहिल्या चार टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीबाबत मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका याव्यात अशी स्थिती आहेत. सर्वप्रथम मतदानाच्या टक्केवारीचे आकडे सार्वजनिक करण्यास आयोग विलंब करतो. मग ती आकडेवारी आणि नंतरची आकडेवारी यात फरक असतो व यंदा यात १ कोटी ७ लाख मतांची तफावत आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यायला हवीत. लाखो ईव्हीएम मशीन गायब झाल्याबाबतही निवडणूक आयोग कोणतीही स्पष्ट माहिती देत नसल्याने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ही निवडणूक ही देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे आणि ती वाचवण्यासाठी आम्ही लढत राहू असे आम्ही वारंवार सांगत आहोत असाही निर्धार काँग्रेसने व्यक्त केला.