शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राकेश केसरे या सहा वर्षीय बालकाचे दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाले होते. दोन दिवस शाहूवाडी पोलीस त्याचा शोध घेत होते. घराच्या दारात खेळत असताना त्या बालकास कुणीतरी फूस लावून पळवून नेले. त्यामुळे पोलीस गावातील विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी आरव याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस आढळला. त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी जखमा होत्या. याशिवाय हळदीकुंकूही लावल्याचे दिसत होते. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
वाचा: भाजपची नियत दिसली! यूपीतील हिंसाचाराची पवारांनी केली ‘जालियनवाला’शी तुलना
सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. तेथून तो त्याच्या पालकांना देण्यात आला. हा नरबळी आहे की पोलीस यंत्रणेला चकवा देण्यासाठी मुद्दाम केलेली ही खेळी आहे, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. कागल तालुक्यातील सावर्डे येथे महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता. त्याबाबत अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. तो तपास पूर्ण होण्यापूर्वीच वारणा कापशी खोऱ्यात नरबळीचा नवा प्रकार उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कापशी येथे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक रवींद्र साळोखे, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय पाटील, कोडोली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद, कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे, फॉरेन्सिक लॅब श्वानपथक तळ आदी तपास यंत्रणा ठोकून आहे.
वाचा: हा शेतकऱ्यांवरचा हल्लाच; लखीमपूर घटनेवरून शरद पवार कडाडले