कौशिक हा मूळचा हरयाणाचा. नऊ वर्षांचा असताना विजेच्या धक्क्याने त्याने दोन्ही पायांचा गुडघ्याखालचा भाग तसेच एक हात गमावला. सध्या तो कृत्रीम अवयवांचा वापर करत आहे. व्यवसायाने फिटनेस ट्रेनर असलेला कौशिक मागील वर्षी काम करण्यासाठी गोव्यात दाखल झाला. मात्र आपले दिव्यांगत्व त्याने कधीच आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येऊ दिले नाही. यातूनच त्याने एव्हरेस्ट बेसकॅम्पच्या धाडसी मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि मानसिक बळावर ही मोहीम फत्तेही केली.
मोहिमेचा पहिला दिवस त्याच्या कौशल्याचा कस पाहणारा ठरला, मात्र हार मानायची नाही असा निश्चय त्याने केला आणि मार्गक्रमण सुरू ठेवले. आठ दिवसांची मोहीम पारपाडून ११ मे रोजी तो १७ हजार ५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेसकॅम्पला पोहोचला. देशभरातील अन्य दिव्यांगांसाठी आपण एक उदाहरण समोर ठेवले आहे, याचे समाधान असल्याची भावना कौशिक याने मोहिमेवरून परतल्यानंतर, पणजी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
या मोहिमेच्या यशामुळे हातापायांपैकी तीन अवयव कृत्रीम असलेल्या एव्हरेस्ट बेसकॅम्पला पोहोचलेला कौशिक हा पहिलाच गिर्यारोहक ठरला आहे, अशी माहिती डिसॅबिलिटी राइट्स असोसिएशन ऑफ गोवा या संस्थेचे प्रमुख अवेलिनो डिसोझा यांनी दिली.
गिर्यारोहण मोहीम माझ्यासाठी आव्हानात्मक होताी. पण हे करायला हवे, हा माझा ठाम निश्चय होता. मानसिक बळावर मी ही मोहीम तडीस नेली.- तिनकेश कौशिक