वृत्तसंस्था, बेंगळुरू : अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. ‘भारतात परत येऊन या प्रकरणी तपासाला सामोरे जा; अन्यथा माझ्या संतापाचा सामना करावा लागेल आणि सर्व कुटुंबीय तुझ्यावर बहिष्कार घालतील,’ असा इशारा माजी पंतप्रधान आणि प्रज्वल यांचे आजोबा एच. डी. देवेगौडा यांनी गुरुवारी दिला.दुसरीकडे, प्रज्वल यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली. ‘माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि हासन मतदारसंघातील खासदार आणि चालू लोकसभा निवडणुकांतील उमेदवार असलेले प्रज्वल रेवण्णा हे त्यांच्या गंभीर कारवाया उघड झाल्यानंतर आणि गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी आपल्या राजनैतिक पासपोर्टच्या आधारावर २७ एप्रिल २०२४ रोजी भारतातून पळून जर्मनीला गेले हे लज्जास्पद आहे,’ असे सिद्धरामय्या यांनी या पत्रात लिहिले आहे. त्यांनी याआधी एक मे रोजीदेखील पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले होते. तर पासपोर्ट रद्द करण्याच्या विनंतीवर आपण प्रक्रिया करत आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
‘प्रज्वल यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी ठरावीक प्रक्रियेचे पालन करावे लागेल. केंद्र सरकार याबाबत सहकार्य करण्यास; तसेच प्रज्वल यांना मायदेशी आणण्यास तयार आहे,’ असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
‘प्रज्वल यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी ठरावीक प्रक्रियेचे पालन करावे लागेल. केंद्र सरकार याबाबत सहकार्य करण्यास; तसेच प्रज्वल यांना मायदेशी आणण्यास तयार आहे,’ असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला मी केवळ एवढेच म्हणू शकतो- प्रज्वल हा जिथे कुठे असेल, तिथून त्याने परत यावे आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करावी. त्याने कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे. ही विनंती नाही, तर सज्जड इशारा आहे. असे न केल्यास त्याला माझ्या आणि कुटुंबीयांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. कायदा त्याचे काम करेलच; पण कुटुंबीयही त्याला बहिष्कृत करतील. माझ्यासाठी काहीही आदर उरला असेल, तर त्याने तातडीने परत यावे.
– एच. डी. देवेगौडा,