Sankashti Chaturthi 2024 Tithi :
हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्य दैवत मानले जाते. पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्याचा कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते. एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायकी चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी.
यंदा वैशाख मासातील कृष्ण पक्षात येणार संकष्टी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल. या दिवशी उपवास केल्याने अनेक अडचणी दूर होतात. तसेच श्रीगणेशाची आराधना केल्याने आर्थिक संकाटांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. कोणत्याही शुभ कार्यात गणपतीची पूजा केल्याने लाभ होतो. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी तिथी, पूजा पद्धत
1. एकदंत संकष्टी चतुर्थी तिथी आणि चंद्रोदय
वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. यंदा संकष्टीचे व्रत रविवारी, २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी सुरु होईल. तर सोमवारी २७ मे ला दुपारी ४ वाजून ५३ मिनिटांनी चतुर्थी तिथी संपेल. संकष्टीचे व्रत २६ मे रोजी केले जाणार आहे. नेहमीप्रमाणे चंद्रोदय झाल्यानंतर संकष्टीचे हे व्रत सोडले जाईल.
संकष्टीचा व्रत केल्यानंतर सुर्योदयानंतर श्रीगणेशाची विधीवत आणि मनोभावे पूजा करा. सकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत ते १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो आहे. या योगात कोणतेही कार्य केल्यास त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. २६ मे ला रात्री १० वाजून १२ मिनिटांनी चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राला अर्घ्य देऊ शकता.
2. एकदंत संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
- धार्मिक शास्त्रामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूजले जाते. श्रीगणेशाची आराधना केल्यानंतर कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही.
- संकष्टी चतुर्थीचे व्रत करुन श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात.
- श्रीगणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात अनेक अडचणींवर मात करता येते.
- श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कामात यश मिळते. एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनात समृद्धी येते.