घडले असे की, आधीच्या किरकोळ वादातून काहीच क्षणांत एक गटाने दुसऱ्या गटाच्या दुकानावर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि लाठ्या काठ्या देखील बरसल्या. एवढ्यात गच्छीवर चढलेल्या दुकान मालकाने आपल्या परवानाधारक बंदुकीने गोळ्या झाडायला सुरुवात केली. या राड्यात दोन्ही गटातील डझनभर लोक जखमी झाले आहेत. पण पोलिस दावा करतायत की, कोणीही गंभीर स्वरुपात जखमी झालेलं नाही.
घटनेतील एका गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ ज्ञात आणि १० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारणावरुन गुरुवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जमावातील लोकांनी हातबॉम्ब फेकले आणि गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी अनियंत्रित जमावाने चौकात असलेल्या दुकानात व घरात घुसून महिला व लहान मुलांना जबर मारहाण केल्याचे देखील समजते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार फत्तेपूर रोशनी गावातील रहिवासी सत्यम सिंग राजेंद्र हे पाण्याची बाटली घेण्यासाठी चौकातच कारमधून उतरले तेव्हा तिथे असलेला गंगा सिंग नावाचा तरुण आधीच पोहोचून गाडीजवळ पाणीपुरी खात होता. यादरम्यान या दोन युवकांमध्ये आधी काही कारणांवरुन बाचाबाची झाली होती. नंतर मोठा वाद झाला आणि तो विकोपाला गेला.
नीलम सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्यनगर येथील रहिवासी दीपू, हरिशंकर, लाला तांडिया, लालू, हरिकिशन, सुनील, कल्लू, गंगा सिंग, लल्लन आणि १० अज्ञात लोकांविरुद्ध रानिया पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी शेकडो लोकांनी दुसऱ्या पक्षाच्या दुकानावर हल्ला केला. आपल्याविरोधात चुकीचा गुन्हा करण्यात आल्याचे सांगत दुकानाच्या आजूबाजूला जो कोणी दिसला त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर दुकानमालक रवी गुप्ता यांनी आपल्या गच्छीवर जात परवानाधारक बंदुकीतून गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.