ढाका ट्रिब्यूननं दिलेल्या वृत्तानुसार, खासदार अन्वर यांचा बालमित्र आणि व्यावसायिक भागीदार अकतारुजज्जमान शाहीन हाच हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. अन्वर यांचा आणखी एक मित्र अमानुल्लाह अमान यानंही हत्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार अनवारुल यांच्या हत्येची योजना आखण्यासाठीच शाहीन कोलकात्याला आला होता. हत्येचा प्लान यशस्वी केल्यानंतर तो बांग्लादेशला परतला. अमानसह सहा जणांनी अनवारुल यांची उशीनं तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर अन्वर यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते ट्रॉली बॅगमध्ये टाकले आणि ती बॅग एका अज्ञात ठिकाणी फेकून दिली.
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या हेर विभागानं हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात हत्येच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली आहे. अनवारुन यांची मुलगी मुमतारिन फिरदोस डोरिन यांनी बुधवारी शेर-ए-बांग्ला नगर पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार नोंदवली होती. त्याचवेळी कोलकात्यातही एक वेगळी तक्रार नोंदवण्याची तयारी सुरु होती. कोलकात्यात पोलिसांनी अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे घेऊन जाणाऱ्या कार चालकाला अटक केली होती.
अकतारुज्जमान शाहीननं व्यावसायिक वादातून खासदार अनवारुल यांची हत्या केली. शाहीन झेनईदहचा रहिवासी आहे. त्याच्याकडे अमेरिकेचंही नागरिकत्व आहे. त्याचा भाऊ झेनईदहच्या कोटचांदपूर महापालिकेचा महापौर आहे. अनवारुल झेनईदह मतदारसंघाचेच खासदार होते. शाहीन ३० एप्रिलला अमान आणि त्याची मैत्रीण सिलिस्टा रहमानसोबत कोलकात्याला गेला होता. त्यांनी कोलकात्याच्या सांजिबा गार्डनमध्ये एक डुप्लेक्स भाड्यानं घेतला. शाहीनचे दोन सहकारी सियाम आणि जिहाद आधीपासूनच कोलकात्यात होते. त्यांनी मिळून हत्येचा कट रचला.
शाहीन १० मे रोजी बांग्लादेशला परतला. हत्येची संपूर्ण जबाबदारी त्यानं अमानकडे सोपवली होती. अमाननं बांग्लादेशातून दोन मारेकऱ्यांना कोलकात्यात बोलावलं. फैजल शाजी आणि मुस्ताफिज ११ मे रोजी कोलकात्यात आले, कटात सहभागी झाले. खासदार १२ मे रोजी कोलकात्यात येणार असल्याची माहिती शाहीनला आधीपासूनच होती. त्यानं अमानला हत्येची तयारी करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी धारदार शस्त्रांची खरेदी करण्यात आली. खासदार अन्वर १२ मे रोजी दर्शन बॉर्डरहून कोलकात्याला पोहोचले. तिथे ते त्यांचा मित्र गोपाळच्या घरी थांबले. या दरम्यान मारेकऱ्यांनी १३ मे रोजी त्यांना आपल्या फ्लॅटवर बोलावलं.
अनवारुल १३ मे रोजी संजीबा गार्डनमध्ये अमानच्या अपार्टमेंटमध्ये गेले. यावेळी अमानच्या साथीदारांनी अनवारुल यांना पकडलं. शाहीनचे पैसे परत दे, असं त्यांनी खासदारांना सांगितलं. वाद विकोपाला गेला. मारेकऱ्यांनी अनवारुल यांचं तोंड उशीनं दाबलं आणि त्यांना संपवलं. हत्येची माहिती अमाननं शाहीनला दिली. शाहीनच्या सांगण्यावरुनच अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.
तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जवळच्या शॉपिंग मॉलमधून दोन मोठ्या ट्रॉली बॅग आणि पॉलिथिन पिशव्या खरेदी करण्यात आल्या. त्यात मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले. हत्येच्या रात्री तुकडे फ्लॅटमध्येच होते. मारेकऱ्यांनी ब्लिचिंग पावडर आणून फ्लॅटमधील रक्ताचे डाग स्वच्छ केले. अमान आणि त्याचे सहकारी ट्रॉली बॅग आणि अनवारुल यांचे बूट घेऊन जात असल्याचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे. ते कोलकाता पोलिसांच्या हाती लागलं आहे.
अमाननं दिलेल्या माहितीनुसार, अकतारुज्जमान शाहीन खासदाराच्या हत्येसाठी पाच करोड टंका इतकी रक्कम देण्यास तयार होता. त्यानं हत्येच्या आधीही आरोपींना पैसे दिले होते. उर्वरित रक्कम तो हत्येनंतर देणार होता. हत्येनंतर अमान ढाक्याला परतला. तो शाहीनला भेटला. अमान त्याच्या बहिणीच्या घरी लपला होता. तिथून त्याला अटक करण्यात आली.
अनवारुल यांच्या हत्येला सोन्याच्या तस्करीची पार्श्वभूमी आहे. तस्करीच्या पैशावरुन वाद होता. अकतारुज्जमान शाहीन सोने तस्कर आहे. खासदार अनवारुल यांच्यावरही तस्करीचे आरोप झाले आहेत. अनवारुल २०१४, २०१८ आणि २०२४ असे सलग तीन वेळा झेनदेईमधून अवामी लीगच्या तिकिटावर खासदार झाले होते.