दरम्यान रुग्णालयात एका महिला डॉक्टरसोबत झालेल्या छेडछाडीच्या कृत्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. याची तक्रार पोलिसांना मिळताच पोलिस रुग्णालयात पोहोचले होते. छेडछाडीचे कृत्य करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी थेट आपात्कालीन कक्षातच गाडी घुसवल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरसोबत १९ मे ला छेडछाडीची घटना घडली होती. सायंकाळच्या सुमारास ऋषिकेशच्या एम्समध्ये ऑपरेशन चालू होते, यादरम्यान ऑपरेशन कक्षात असलेल्या महिला डॉक्टरसोबत नर्सिंग ऑफिसर सतीश कुमार यांनी छेडछाड केली. ज्या घटनेने रुग्णालयात खळबळ माजली होती.
सदर घटनेविरोधात एम्सच्या डॉक्टरांनी देखील विरोध दर्शवला आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान डॉक्टरांनी रुग्णालय अधिष्ठाता यांच्या कार्यालयाला सुद्धा घेराव घातला होता. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केल्याचे सांगितले आहे.
पोलिस आरोपीला अटक करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. दरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात आरोपीला बेड्या ठोकल्या. परिस्थिती जाणून पोलिसांनी त्यांची जीप थेट आपत्कालीन कक्षातच घुसवली. यावेळी वॉर्डमधील रुग्ण आणि सुरक्षारक्षक थक्क झाले. सुरक्षारक्षक शिट्टी वाजवत रुग्णांचे स्ट्रेचर हटवण्याचं काम करत होते.
पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपी नर्सिंग ऑफिसर सतीश कुमार मुळचा राजस्थानचा आहे. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जाणार आहे. यातच उत्तराखंड महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कंडवाल यांनी देखील या आरोपाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
पोलिस पुढे म्हणाले, २१ मे रोजी पीडित महिला डॉक्टरने कोतवाली ऋषिकेश येथे लेखी तक्रार दिली होती. १९ मे रोजी एम्समधील ट्रॉमा ओटी कॉम्प्लेक्स मध्ये नर्सिंग अधिकारी सतीश कुमार यांनी तिच्याशी शारीरिक छळ केला आणि धमकावले. तक्रारीच्या आधारे तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीवर कारवाई करण्यात येत आहे.