डेली स्टारच्या वृत्तानुसार, डिस्कव्हरी+ वर फेस डॉक्टर्स नावाची नवीन मालिका येत आहे, ज्यामध्ये या व्यक्तीबद्दल सांगण्यात आले आहे. ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या टेरी नावाच्या या व्यक्तीला दातांचा संसर्ग झाला होता. जेव्हा त्याचा त्रास खूप वाढला तेव्हा तो केंब्रिजच्या एडनब्रुक हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी त्याचा एक दात काढला. यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडू लागली. कारण, त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर मांस खाणारे किडे पसरू लागले होते. हे पाहून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ज्याप्रकारे हा संसर्ग पसरत होता, ते पाहून डॉक्टरही हादरु गेले होते.
सर्जन शादी बस्युनी यांनी सांगितले की, आम्ही असं काही कधीही पाहिले नव्हते. त्याच्या डोळ्यांवर सूज आली होती, ज्याचा रंग जांभळा होऊ लागला होता. जर ते डोळ्याच्या सॉकेटमध्ये पसरले असते तर त्याचे डोळे कायमचे खराब झाले असते. दंत संक्रमण खरोखर धोकादायक असू शकते. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
डॉक्टरांनी टेरीच्या डोळ्यातून पू काढला आणि जखम भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा जीव वाचवणे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. अन्यथा त्याला सेप्सिस होऊ शकला असता, जे त्याच्या जीवावर बेतू शकले असते. आम्ही त्याची पापणी कापली आणि त्याचा जीव वाचवण्यात आम्हाला यश आले. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली नसती तर हा संसर्ग त्याच्या संपूर्ण शरिरात पसरला असता आणि त्याचे अवयव निकामी झाले असते. असंही डॉक्टरांनी सांगितलं.