आर्यन खान, अरबाझची रात्रभर एकत्र चौकशी; ही माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अमली पदार्थ सेवन व बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला आर्यन शाहरुख खान व अरबाझ मर्चंट यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) एकत्र चौकशी केली जात आहे. कोठडीत असताना सोमवारी रात्रभर या दोघांच्या चौकशीचे सत्र चालले, असे सूत्रांनी सांगितले.

‘कॉर्डिला’ क्रूझवर झालेल्या या कारवाईत आर्यन खान व अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जण ‘एनसीबी’च्या कोठडीत आहेत. त्यांना सात ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याने एनसीबीला तोपर्यंत अधिकाधिक माहिती गोळा करायची आहे. त्यामुळेच दिवसरात्र या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या पार्टीच्या आधी आर्यन व अरबाझ हे सातत्याने संपर्कात होते, हे दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून दिसून आले आहे. हे दोघेही काही अमली पदार्थ दलालांशीदेखील सातत्याने चर्चा करीत होते, असे समोर आले आहे. त्यामुळेच हे दलाल नेमके कोण, त्यांचा ठावठिकाणा काय, हे जाणून घेण्यासाठी या दोघांची एकत्रित चौकशी होत आहे, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

देशभरात अनेक ठिकाणी पथके

क्रूझवरील ही पार्टी सहा जणांनी आयोजित केली होती. ते सहा जण दिल्लीतील बडे उद्योजक व दलाल असल्याची माहितीदेखील ‘एनसीबी’ला मिळाली आहे. त्या सहा जणांना शोधून काढण्याचे काम आता ‘एनसीबी’ने हाती घेतले आहे. त्यासाठी देशभरातील महत्त्वाच्या ठिकणी ‘एनसीबी’ने विशेष पथके नेमली असून त्यात दिल्ली, अहमदाबाद, पंजाब, हरियाणा या ठिकाणांचा समावेश आहे. सध्या बरेचसे दलाल मुंबईतील कारवाईला घाबरून हरियाणा, पंजाबहून व्यवसाय चालवत आहेत. त्यामुळेच तेथेही कसून तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Source link

aryan khanAryan Khan drugs caseAryan Khan Drugs Case UPDATEmumbai newsआर्यन खानआर्यन खान ड्रग्स केस
Comments (0)
Add Comment