या जोडप्याच्या लग्नाला २२ वर्ष झाले होते आणि त्यांना पाच मुली झाल्या होत्या. मुलगा पाहिजे म्हणून नवरा रोज बायकोसोबत वाद घालत होता. पन्ना लाल आपल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करणार असल्याची धमकी देऊ लागला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या नातेवाईकांनी पन्ना लालला बायकोसोबत भांडण करू नका अशी विनंती केली पण याचा काही फायदा झाला नाही.
सप्टेंबर २०२० रोजी या जोडप्यात जन्मनाऱ्या बाळाच्या लिंगावरुन पुन्हा भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की, पन्ना लालने तिला पोट कापण्याची धमकी दिली. जेव्हा त्याच्या बायकोने त्याला विरोध केला तेव्हा त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पन्ना लाल विळा घेऊन त्याच्या बायकोवर हल्ला करण्यासाठी पुढे गेला तेव्हा त्याच्या बायकोने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण नवऱ्याने बायकोला पकडत विळ्याने बायकोच्या पोटावर वार केला व तिचे पोट कापले. त्याच्या बायकोने न्यायलयात दिलेल्या जबाबात सांगितले की, वार एवढा खोलवर होता की पोटातील आतड्या लटकत होत्या.
पोटावर वार झाल्यानंतर ती तिथून पळून गेली. तिचा भाऊ जवळच्याच दुकानात काम करत होता तिचा आवाज ऐकून तिच्या मदतीला आला. महिलेच्या भावाला बघून तिच्या नवऱ्याने तेथून पळ काढला. तिच्या भावाने तिला लगेच दवाखान्यात दाखल केले. महिला त्या हल्ल्यानंतर बचावली पण तिच्या पोटातील बाळ जो की मुलगा होता त्याचा मृत्यू झाला.
न्यायालयीन सुनावणी दरम्यान, आरोपीने सर्व आरोप फेटाळले. आरोपीने सांगितले की, ‘बहिण भावात मालमत्तेचा वाद होता. तिने स्वतःच आपल्या पोटावर वार केले व माझ्यावर खोटा खटला टाकला.’