हायलाइट्स:
- मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकार
- भोंदूबाबा २४ वर्षीय युवक-महिलांना द्यायचा नारळ, धागा, विडी आणि माचिस, नंतर…
- अमरावतीमध्ये भोंदूबाबाचा ‘अंनिस’ने केला भंडाफोड
अमरावती : कितीही समाजप्रभोधन केलं तर भोंदूगिरी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अमरावतीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील एक २४ वर्षीय युवक स्वत:ला एका संतांचा अवतार सांगून मुल बाळ हवे असेल तर, सव्वा महिन्याचा उपवास करावा लागेल, अशी थाप देवून महिलांच्या अंगावरून कापूर उतरवणाऱ्या एका भोंदूबाबाचा ‘अंनिस’ने भंडाफोड केला.
रुग्ण म्हणून या बाबाच्या दरबारात पोहोचलेल्या ‘अंनिस’च्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला नुकतीच अटक केली आहे. महादेव खोरी येथील २४ वर्षीय अल्पेश गुणवंतराव पाटील हे भोंदूबाबाचे नाव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका महिला पदाधिकारी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.
महादेवखोरी भागात अल्पेश पाटील हा राहतो व तो स्वत:ला एका संतांचा अवतार असल्याचे सांगून महिलांवरुन कापूर उतरवतो, त्यांना नारळ, धागा, विडी, माचिस देतो. अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे ‘अंनिस’च्या महिला पदाधिकाऱ्यांनी अल्पेश पाटीलकडे नावनोंदणी केली. त्या सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास रुग्ण बनून अल्पेश पाटीलकडे गेल्या. आपल्याला १० वर्षांपासून मूलबाळ होत नाही, असे त्यांनी अल्पेश बाबाला सांगितले. त्यावर अल्पेश पाटीलने नारळ, धागा, बिडी व माचिस आणण्यास सांगितले. ते आणले असता, त्याने कापूर लावण्यास सांगितले.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्याने तो कापूर त्यांच्या अंगावरून उतरवला. त्यांना अंगारा, धागा व लिंबू देण्यात आले व सव्वा महिन्याचा उपवास देण्यात आला. त्यांनी तातडीने ही माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. त्यानंतर अल्पेश पाटीलविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अमानूष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाला प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कायद्याद्वारे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.