हायलाइट्स:
- परभणी तब्बल १४ हजार ६९४ बोगस विद्यार्थी
- आधार कार्ड तपासलं आणि धक्कादायक सत्य समोर
- हे कसं शक्य आहे? एकाच विद्यार्थ्यांचे दोन वर्गात प्रवेश
परभणी : सात वर्षांनंतर राज्याच्या शिक्षण विभागाकडून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्डनुसार पडताळणी सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातून लाखो विद्यार्थी या पडताळणीत बोगस आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. एकट्या परभणी जिल्ह्यात या पडताळणीत तब्बल १४ हजार ६९४ इतके बोगस विद्यार्थी आढळून आलेत.
अनेक विद्यार्थ्यांची नावे दोन-दोन शाळेत नोंदणी करण्यात आली तर एकाच विद्यार्थ्यांचे दोन वर्गात प्रवेश दाखवले गेल्याची नोंद करण्यात आल्याचे आता स्पष्ट झालं आहे. आधार नोंदणी नंतर हा घोळ मिटणार खरा. मात्र, विद्यार्थ्यांच्या नावाने मलिदा खाणारे शिक्षण माफियांवर काय कारवाई होणार हे शासनाने अद्याप स्पष्ट केले नाही. तर दुसरीकडे मुलांच्या बोगस संख्येवरून आता अनेक शिक्षकांच्या नोकरीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जिल्हाभरातून १४ हजार ६९४ बोगस विद्यार्थीची संख्या कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येवरून जिल्हाभरात तब्बल ४९० शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहे. त्यामुळे त्यांचे समायोजन नेमकं कुठे करण्यात येईल हाही मोठा प्रश्न शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान, नेमका घोळ कशामुळे निर्माण झाला. टेक्निकल फेल्युर आहे, का जाणूनबुजून संख्या वाढवून दाखवण्यात आली , याची तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याच शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
एकूणच येणाऱ्या दिवसात शिक्षण विभागाकडून करण्यात येणाऱ्या चौकशीत काय निष्पन्न होते आणि दोषी आढळलेल्यांवर काय कारवाई शिक्षण विभाग करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.