हायलाइट्स:
- जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी
- नागपुरात काँग्रेसने मारली बाजी
- भाजपला केवळ ३ जागांवर विजय
नागपूरः जिल्हा परिषदेत नागपूरमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. नागपुरात काँग्रेसला मोठा विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरू होती. नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेत भाजपला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला आहे आहे.
वाचाः नागपुरात आधी भाजपच्या विजयाची घोषणा, नंतर १० मिनिटांत निकाल बदलला अन्…
नागपूर ही भाजपचा बालेकिल्ला असल्याचे बोललं जातं. देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी या दोन मोठ्या नेत्यांचा नागपूर जिल्हा असल्यानं या जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक आहे. मात्र, असे असतानाही भाजपला केवळ ३ जागांवर आपले वर्चस्व कायम राखण्यास यश आलं आहे. तसंच, केवळ अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीमुळं या जागा भाजपच्या हातात गेल्याची चर्चा आहे.
काँग्रेसला जिल्हा परिषदेत ९ जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २ जागा वाढल्या आहेत. काँग्रेसच्या सुनील केदारे यांचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा आहे. तर, भाजपनं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एका जागेचं नुकसान झालं आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या तर, यंदा ३ जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं आहे.
वाचाः अनिल देशमुखांना मोठा धक्का; दोन महत्त्वाच्या जागा भाजपच्या ताब्यात
भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षित यश. महाविकास आघाडी एकत्र लढल्याने त्यांचं यश मोठं दिसतंय, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद अंतिम निकाल
जागा १६
निकाल प्राप्त- १६
भाजप- ०३
शिवसेना- ००
राष्ट्रवादी- २
काँग्रेस- ९
शेकप – ०१
गोंडवाना गणतंत्र पार्टी- ०१
इतर- ००
वाचाः बलाढ्य विरोधकांना मात देत अकोल्याचा गड ‘वंचित’नं राखला!